
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर मनसेच्या दीपोत्सवानं ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. दिवाळीच्या पहिला दिवशी दीपोत्सवाला सुरुवात करण्याची मनसेची परंपरा…यंदा या उद्घाटन सोहळ्याला राज ठाकरेंचे बंधू उद्धव ठाकरे हजर होते.
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज नात्यांचा उत्सव पाहायला मिळाला. मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आलं. ठाकरेंच्या दोन्ही पिढ्यांमधला वाढलेला जिव्हाळा आज दिसून आला.
ठाकरे कुटुंबीयांच्या मनोमिलनासाठी प्रार्थना करणाऱ्या अनेकांसाठी शिवाजी पार्कवरचा दीपोत्सव डोळ्यांत साठवण्यासारखा होता.पण या कौटुंबिक सोहळ्याला राजकीय अँगलही होता.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे दरवर्षीप्रमाणं मनसेचा दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी या दीपोत्सवात नात्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. मनसेचा दीपोत्सव म्हणजे दिवाळीच्या आतषबाजीत राजकारणातही चर्चेचा विषय ठरलाय. यंदा तर मनसेचा हा दीपोत्सवाचा उद्घाटन सोहळा आगळावेगळा ठरला. मनसेच्या या दीपोत्सवाचं उद्घाटन राज ठाकरेंचे थोरले चुलत बंधू उद्धव ठाकरेंनी केलं.
मराठी माणसाची एकजुट आणि त्याचा प्रकाश सर्वांच्यामधये आल्याशिवाय राहणार नाही,असेच आनंदी आणि एकत्र राहा या शुभेच्छा उद्धव ठाकरेंनी दिल्या. दीपोत्सवाच्या निमित्तानं अख्खं ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं. संध्याकाळी सहाच्या सुमारास उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर दाखल झाले.
तासभर गप्पाटप्पा झाल्यानंतर ठाकरे कुटुंब शिवाजी पार्कवर जाण्यासाठी बाहेर पडलं. शिवतीर्थ ते शिवाजी पार्क…अवघ्या काही पावलांचं अंतर,ठाकरे बंधूंनी एकाच गाडीतून हे अंतर पार केलं. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी एकाच गाडीतून प्रवास केला. राज ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर होते, तर उद्धव ठाकरे त्यांच्या शेजारी होते.
2012 मध्ये उद्धव ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमधून राज ठाकरेंनी स्वत: ड्रायव्हिंग करत मातोश्रीवर नेलं होतं. त्यानंतर सोबत प्रवासाचा योग १३ वर्षांनी दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा जुळून आला.
ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीनंही एकाच गाडीत प्रवास करत नातं घट्ट केलं. आदित्य ठाकरे गाडी चालवत होते, त्यांच्य़ा शेजारी अमित ठाकरे आणि मागच्या सीटवर उर्वशी ठाकरे बसल्या होत्या.
विशेष म्हणजे रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरेंनी एकाच गाडीतून प्रवास केला. शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोन जावांमधलं बॉण्डिंग याठिकाणी पाहायला मिळालं. शर्मिला ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं.
दीपोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्क जिमखाना पाहण्यासाठी गेलं.शिवाजी पार्कावरचा नात्यांचा हा दीपोत्सव संस्मरणीय ठरला
Published at : 17 Oct 2025 10:45 PM (IST)