
Sanjay Raut: ठाणे महानगरपालिकेत (Thane Municipal Corporation) शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि मनसे (MNS) एकत्र लढणार आहेत, अशी थेट घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. ठाण्यात ठाकरे हे ठिकऱ्या उडवतील, असा इशारा देखील संजय राऊतांनी दिलाय. दोन भाऊ एकत्र लढतील, तेव्हा ताकद दिसेल. दोन भावांचं अब की बार बार 75 पार, असे म्हणत भाजपच्या अब की बार 70 ला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दोन ठाकरे बंधूंची अधिकृतपणे राजकीय युतीची घोषणा कधी होईल? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना खासदार संजय राऊत यांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Sanjay Raut: संजय राऊतांनी ‘मनसे’ रणशिंग फुंकलं
संजय राऊत पत्रकार परिषद म्हणाले की, आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार आहोत. आमचा नारा 75 पार आहे. ते जे म्हणतील त्याच्यापेक्षा आम्ही पाच जास्त सांगू. दोन ठाकरे आहेत. दोन ठाकरे सब पे भारी. यावर चर्चा होत राहील. हा सोबत आहे का? तो सोबत आहे का? पण या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या. जेव्हा दोन भाऊ एकत्र येणार तेव्हा आमची ताकद दिसेल, असे त्यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut on Harshvardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही, असे वक्तव्य केले. तसेच, महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचे असल्यास तो निर्णय दिल्लीतून होईल, असे देखील ते म्हणाले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजून मनसेचा प्रस्ताव दिलेलाच नाही. त्यांची वर्किंग कमिटी असते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीचा तो पक्ष आहे. तो अजूनही तसाचं आहे, असे त्यांनी म्हटले.
Sanjay Raut on Ashish Shelar: राऊतांची आशिष शेलारांवर टीका
आम्ही हिंदुत्ववादी असल्याच्या घोषणा यांनी शिवाजी पार्कवर केल्या होत्या, पण यांच्या हिंदुत्वाचा रंग काँग्रेसच्या टिळक भवनापर्यत जाऊपर्यंत विरला असा टोला मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लगावला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला जाऊ नका आणि नाटक करू नका. भाजपचा रंग भ्रष्टाचाराचा आहे. भाजप पक्ष भाजपचा राहिला का? सगळे काँग्रेस, राष्ट्रवादीवाले भाजपमध्ये आले आहेत. स्वत:ची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार तुम्ही? असे म्हणत त्यांनी आशिष शेलारांवर टीका केली.
आणखी वाचा
आणखी वाचा