
मुंबई : दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके फुटणार आहेत. मात्र, तत्पूर्वी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन मतदार यादीतील घोळाबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यावेळी, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयोगाला कडक प्रश्न विचारले. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करत त्यांना टोलाही लगावला. दरम्यान, आता अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) यांनी राज ठाकरेंच्या मिमिक्रीवरुन त्यांच्यावर टीका केलीय. तसेच, सदावर्ते यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं असून थेट नथुराम गोडसे याच्या विचारांशी आपला डीएनए असल्याचं म्हटलं आहे. विशेष शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही त्यांनी या वादात ओढलं आहे. त्यामुळे, आता एकनाथ शिंदे यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे आणि आमचा एकच डीएनए आहे. पंडीत नथुराम गोडसे याच्या विचारांसाठी आनंद दिघे कोर्टात लढले होते. म्हणुन आनंद दिघे, एकनाथ शिंदे आणि आमचा डिएनए एकच आहे, असे वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलंय. दिवाळी सणाच्या निमित्ताने एबीपी माझाशी बोलताना सदावर्ते यांनी चक्क नथुराम गोडसेला पंडित म्हणत त्यांच्या विचारांशी आपण सहमत असल्याचे म्हटलं आहे. पंडीत नथुराम गोडसेच्या विचारांसाठी आनंद दिघे लढले होते, म्हणुन आनंद दिघे यांच्या विचारांचे एकनाथ शिंदे आणि मी आहे, असे सदावर्ते यांनी म्हटलं. तर, ठाकरे बंधुच्या युतीवर आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर तिखट शब्दात टीका देखील केली आहे.
राज ठाकरे अजित पवारांच्या पायाची धूळ
राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस आहेत. परिक्षेत बढती पास करण्यासाठी 30 मार्कावर पाच देऊन पास केल जात तसं दोघांचं आहे, अशी बोचरी टीका सदावर्ते यांनी केली. अजित पवार यांच्या राजकीय वजनाच्या पायाच्या धुळीप्रमाणे राज ठाकरे आहेत. अजित पवार कितीवेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत, तर राज ठाकरे काय आहेत? असे म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री केली, त्यावरून बोचरी टीका केली. तसेच, मिमिक्री करुन मत मिळत नाहीत राज ठाकरे, असेही सदावर्ते यांनी म्हटलं. दरम्यान, अजित पवारांनी राज ठाकरेंच्या मिमिक्रीवर प्रतिक्रया देताना, माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत, मी काम करणारा माणूस आहे, असे म्हटले होते.
हेही वाचा
…म्हणून तर सोन्याचे भाव गगनाला भिडलेत, आता खाता येईल; जयपूर मिठाईवरुन नेटीझन्स सुस्साट
आणखी वाचा