
Mumbai Local Accident मुंबई: मुंबईतील काल (6 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला. मध्य रेल्वेवरील आंदोलनामुळे ठप्प झालेल्या लोकल अचानक सुरु झाल्या आणि रुळावरुन जाणाऱ्या प्रवाशांना (Mumbai CSMT Local Accident) उडवलं. अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत, सॅन्डहर्ट्स आणि मस्जिद बंदर दरम्यान ही घटना घडली. मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनांनी काल सीएसएमटी स्थानकात आंदोलन केलं, त्यामुळे सुमारे तासभर लोकल ठप्प झाल्या होत्या. आधीच जमावबंदीचे आदेश असताना अशाप्रकारे कामबंद आंदोलन केल्याप्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनांवर सदोष मनुष्यवधाचा आणि रेल्वे कायद्यानुसार आरपीएफ गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमकं काय घडलं? (Mumbai CSMT Local Accident)
काल रेल्वे कर्मचारी संघटनांनी जे आंदोलन केले त्यामुळे अचानक लोकल बंद झाल्या. मोटरमन यांनी लोकल चालवल्या नाहीत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप झाला. याचा फटका मोठ्या प्रमाणात प्रवाशांना तर बसलाच पण भीषण म्हणजे 2 प्रवाशांचा त्यात मृत्यू देखील झाला. कारण गर्दी असल्याने लोकल बंद असल्याने काही प्रवासी लोकल ट्रॅक वरून चालत जात होते. यावेळी सीएएसएमटीकडून निघालेल्या एका लोकलनं मस्जिद स्टेशनजवळ ट्रॅक वरून चालणाऱ्या प्रवाशांना चिरडले. त्यात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 2 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये 19 वर्षीय हेली मोहमाया हिचा मृत्यू झाला असून तिची आई खुशबू मोहमाया गंभीर जखमी झाली आहे.
रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं-
1. सूर्यकांत नाईक (रा. मीरारोड)
2. हेली मोहमाया (वय 19)
रेल्वे अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांची नावं-
1. खुशबू मोहमाया (वय 45)
2. याफिजा चोगले (वय 62)
3. कैफ चोगले
सदर घटनेतील प्रवाशांच्या मृत्यूला जबाबदार कोण? (Mumbai Local Accident)
सदर घटनेतील प्रवाशांच्या मृत्यूला जबाबदार कोण?, असा प्रश्न निर्माण झाला असताना मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी तर यात प्रवाशांची चुकी असल्याचे सांगितले आहे. मात्र अचानक संप पुकारलेल्या रेल्वे कर्मचारी संघटनांचे काय? त्यांच्यावर कोणी गुन्हा दाखल का करत नाही असा प्रश्न प्रवाशांनी विचारलं आहे. हे आंदोलन जर इतर कोणी केले असते तर आरपीएफकडून तत्काळ गुन्ह्याची नोंद करण्यात आली असती मग रेल्वे कर्मचारी संघटना NRUM आणि CRMS यांना वेगळा न्याय का? जीआरपीवर स्वतःच्या अभियंत्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनची या आंदोलनाला मुक संमती होती का? गर्दीच्या वेळी आंदोलन करण्यास ते देखील सीएसएमटी प्लॅटफॉर्मवर निदर्शने करण्यास मध्य रेल्वेचे महाप्रबंधक आणि DRM यांनी परवानगी का दिली? आंदोलन वेळीच रोखले का नाही? एक तास लोकल बंद होण्यापर्यंत आंदोलकांना मुभा का देण्यात आली? आधीच बातचीत करून आंदोलन का मागे घेण्यात आले? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही मध्य रेल्वेच्या जीएम आणि डीआरएम यांना द्यावीच लागणार आहे.
न्यायालय काय निकाल देणार याकडे लक्ष- (Mumbai Central Railway)
मुंब्रा येथील अपघातात 5 जणांना प्राण गमवावे लागले. त्यामागे प्रवाशांचीच चूक असल्याचे मध्य रेल्वेने ठासून सांगितले होते. त्यानंतर मध्य रेल्वेने गठीत केलेल्या समितीच्या अहवालात देखील बाहेर लटकलेल्या प्रवाशांच्या बॅग घासल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते. पण यामागे ट्रॅक मेंटेनंस करणाऱ्या मध्य रेल्वेच्या अभियंत्यांची चुकी होती, असे लोहमार्ग पोलिसांच्या तपासात आणि व्हीजेटीआयच्या अहवालात नमूद झाल्यानंतर 2 अभियंत्यांवर लोहमार्ग पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. याचविरोधात काल (6 नोव्हेंबर) रेल्वे कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले आणि मध्ये रेल्वे मार्गावरील लोकल बंद केल्या. लोकल बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि त्यामुळे 2 जणांना अपघातात जीव गमवावा लागला. याच दोन अभियंत्यांनी अटकेपासून बचाव व्हावा यासाठी ठाणे यायालयात अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. या दोघांना अटक होणार की अटकेपासून संरक्षण मिळणार हे आज होणाऱ्या सुनावणी ठरणार आहे. कालची घटना झाल्यानंतर न्यायालयात जीआरपी काय बाजू मांडणार आणि न्यायालय काय निकाल देणार याकडे लक्ष लागले आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा