
संभाजीनगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) जाहीर झाल्या असून महापालिकांच्या निवडणुकांसाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली असून शिवसेना पक्षानेही मनसेला सोबत घेऊन मुंबई जिंकायची रणनीती आखली आहे. त्यातच, आता मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यास आदित्य ठाकरेंना महापौर बनवण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. माध्यमांत आलेल्या या चर्चेवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्पष्टीकरण देत भाजपला जोरदार टोला लगावला. तसेच, आदित्य ठाकरे महापौर (Mayor) होण्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले आहे.
शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. अतिवृष्टीनंतर सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही, याचा आढावा ते बांधावर जाऊन घेत आहेत. याचदरम्यान, आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या महापौर पदाबाबतच्या प्रश्नावर सडेतोड उत्तर दिलं. या बातमीचा उगम कुठून झाला हे मला कळून घ्यायचं आहे आणि मला ते कळलं आहे. या अफवेचा उगम संघातून झाला, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, अहमदाबादच नाव बदलायचं आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांना अहमदाबादचा महापौर बनवावं लागेल, अशी संघात चर्चा सुरू आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. आता मला बघायचं आहे, अहमदाबादचा महापौर अमित शहा होणार की नरेंद्र मोदी? असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
भ्रष्टाचारी जनता पार्टी म्हणत भाजपवर निशाणा
उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या, कर्जमाफी करा, पीक विमाचे पैसे द्या अशी मागणी केली. तसेच, सरकारने जाहीर केलेली मदत आधी द्यावी, असेही ते म्हणाले. पार्थ पवार, मुरलीधर मोहोळ, प्रताप सरनाईक यांचं काय होणार? पुढे काहीच झाल नाही. भ्रष्टाचारी जनता पार्टी भ्रष्टाचार केलेल्या लोकांना भाजपसोबत घेतेय, असे म्हणत पार्थ पवार प्रकरणावरुन भाजपला लक्ष्य केलं.
मुंबई भाजप अध्यक्षांची टीका
माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलिकडे यांचे राजकारण जात नाही. मुंबईत यांच्याकडून कोणीही महापौर झाला तरी खानाचीच मानसिकता ते राबवणार आहेत. ममदानी आणि आदित्य ठाकरे यांच्यात साम्य हेच असेल ते म्हणजे लेफ्ट अजेंडा. मुंबईत विकास पाहिला आहे, मुंबईचा रंग बदलता कामा नये हे लोकांना कळलं आहे. त्यामुळे, मुंबईकर सुजाण आहे, दरवाज्यावर उभा असलेला धोका त्यांना कळतो, अशी प्रतिक्रिया भाजप मुंबईचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी दिली.
हेही वाचा
आणखी वाचा