Amol Kolhe : शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाहीत. याचा प्रत्यय तुम्हाला मागील दहा पंधरा दिवसात आला असेल असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत (Tanaji Sawant) सर खेकड्याने धरण फोडलं असं म्हणत असतील तर त्यांच्या विधानाचा कितपत विचार करायचा हे ठरवावे लागेल, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना टोला लगावला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे भ्रष्टाचाराचे किस्से दिसत असतील तर युती का करायची? असा सवाल देखील कोल्हे यांनी केला.
नेमकं काय म्हणाले होते तानाजी सावंत?
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत धारशिव जिल्ह्यात स्वबळाचा नारा देताना माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविषयी वादग्रस्त विधान केले. 2022 ला सत्तांतर केल्यानंतर मी एकमेव युतीतील आमदार आहे जो बोलत होतो ही परिस्थिती राहणार नाही. कारण, राष्ट्रवादीची औलाद अशी आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं त्यांच होतं. वर्षाच्या आतच ते खरं ठरलं’ त्यावेळी मी हे देखील सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. वेगवेगळ्या नाहीत. याचा प्रत्यय तुम्हाला मागील दहा पंधरा दिवसात आला असेल. कोणाला पटो ना पटो माझी जी मतं आहेत ती आहेत, असं देखील तानाजी सावंत म्हणाले.
कबूतरांच्या बाबतीत ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बैठक घेतली होती, इकडे बिबट्याने 57 बळी घेतले, त्यानंतर सरकारला जाग आल्याचे कोल्हे म्हणाले. आम्हाला त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करावं लागलं. आमची मागणी आहे की, राज्य आपत्ती घोषीत करावी. केरळ सरकार करत असेल तर मग आपल्या मुख्यमंत्र्यांना अडचण काय? असा सवालही कोल्हे यांनी केला. सामाजिक न्यायाची भूमिका घेतली पाहिजे, मात्र लक्ष्मण हाके यांना ओबीसी नेते कोणी जाहीर केलं? असा सवाल देखील अमोल कोल्हे यांनी केला. सामाजिक सलोखा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
मातोश्री ड्रोन प्रकरण, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, कोल्हेंची मागणी
मातोश्री ड्रोन प्रकरणावर देखील अमोल कोल्हे यांनी भाष्य केले. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सुरक्षा असताना ड्रोन उडवायला परवानगी का दिली? आणि कोणी दिली? याची चौकशी व्हायला हवी असेही कोल्हे यावेळी म्हणाले. पोटातल्या आगीला जात धर्म नसतो, त्यामुळे काय वक्तव्य होतात याकडे लक्ष देणे गरजेचे नाही असेही कोल्हे म्हणाले.
आणखी वाचा