
Mumbai CNG Gas cut updates: मुंबईच्या वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी सोमवारी मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅबची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. काल दुपारपासून पेट्रोल पंपांवर सीएनजी गॅस (CNG Gas) पोहोचलेला नाही. त्यामुळे मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरातील बहुतांश पेट्रोल पंपांवरील सीएनजी (CNG Petrol Pump) संपला आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसत आहे. याचा फटका सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. सीएनजीअभावी सकाळपासून रस्त्यांवर रिक्षा आणि टॅक्सींची संख्या कमी दिसत आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि नागरिकांना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. (CNS Gas in Mumbai)
वडाळा येथील आरसीएफ परिसरात असणाऱ्या पाईपलाईनमध्ये हा तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे सीएनजी पुरवठा ठप्प आहे. हा बिघाड दुरुस्त होण्यास आणखी किती तास जातील, याबद्दल अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या रस्त्यावर धावत असलेल्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅबचालकांच्या वाहनांमधील सीएनजी देखील संपत आला आहे. त्यामुळे दुपारपर्यंत परिस्थिती पूर्ववत न झाल्यास मुंबईतील रिक्षा-टॅक्सीसह सीएनजीवर चालणाऱ्या खासगी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता आहे.
Mumbai CNG Updates: नेमकं काय घडलं?
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई — या तिन्ही शहरांमध्ये सीएनजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. कारण आरसीएफ कंपाऊंडमधल्या मुख्य सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये मोठा बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या बिघाडामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा अचानक कमी झाला आणि त्याचे थेट पडसाद संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात उमटलेत. महानगर गॅस लिमिटेडने मात्र घरगुती ग्राहकांना प्राधान्याने पीएनजीचा पुरवठा सुरळीत ठेवला जाईल, अशी खात्री दिली आहे. पण सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खाजगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसताना दिसत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास 133 सीएनजी पंपांवर याचा परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी, तसेच बेस्टच्या काही बसेस सीएनजीवर चालतात.
आणखी वाचा
आणखी वाचा