
मुंबई : सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी पुरवठ्यावर (CNG Supply Mumbai) परिणाम होणार आहे. गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये (GAIL Gas Pipeline) बिघाड झाल्याने त्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. असं असलं तरी घरगुती पीएनजी (PNG Supply) ग्राहकांना मात्र कोणत्याही व्यत्ययाशिवाय गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याचं महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून (Mahanagar Gas Ltd) गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे वडाळा येथील MGLच्या सिटी गेट स्टेशनला होणारा सीएनजी गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. याचा फटका मुंबईत गॅस पुरवठ्यावर झाल्याचं पाहायला मिळतंय.