
Vikhroli Parksite Building demolition: मुंबईच्या विक्रोळी पार्कसाईट परिसरात मंगळवारी मुंबई महानगरपालिकेकडून धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात आली. विक्रोळी पार्कसाईट (Vikhroli Parksite) परिसरात अनेक वर्षे जुन्या इमारती आहे. मोक्याच्या जागी असणाऱ्या या इमारतींना पालिकेने धोकादायक घोषित केले होते. या इमारतींचा पुनर्विकास (Redevelopment) केला जाणार आहे. मात्र, येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी पर्यायी जागा न मिळाल्यामुळे या नागरिकांना इमारती सोडण्यास नकार दिला होता. यावरुन महानगरपालिका (BMC) आणि स्थानिक रहिवांशामध्ये वाद होता. मात्र, मंगळवारी महापालिकेने सोबत मोठा पोलीस फौजफाटा आणत या इमारतीमधील नागरिकांना त्यांच्या घरातून बाहेर काढले. यावेळी काही नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला. तेव्हा नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. (Vikhroli News)
सध्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीमधील रहिवाशांना घराबाहेर काढून घरांचे दरवाजे तोडायला सुरुवात केली आहे. पालिकेने आपल्यासोबत तोडकाम करणाऱ्या कामगारांची पथकेही आणली आहेत. नागरिकांनी पुन्हा या घरांमध्ये येऊन राहू नये, यासाठी तोडकाम करणाऱ्या पथकांकडून घरांचे दरवाजे तोडले जात आहेत. या कारवाईला काही स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. या नागरिकांना बळाचा वापर करुन घरातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे सध्या विक्रोळी पार्कसाईट परिसरात तणावाचे वातावरण आहे.