
Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्णव खैरेच्या आत्महत्येनंतर भाजपकडून आंदोलन करण्यात आल्यानंतर सडकून प्रहार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर भाषावाद आणि प्रांतवादाचा विष पसरवल्याचा आरोप करत हल्ला चढवला. भाजपच्या दुटप्पी राजकारणाला लोक समजू लागल्याचे ते म्हणाले. ठाकरे म्हणाले, जाणीवपूर्वक भाषावाद पेटवण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यामागे भाजप आणि संघाचे कपटकारस्थान आहे. “भाषावाद, प्रांतवादाचे विष हे भाजप-संघ पसरवत आहेत आणि खापर मात्र आमच्यावर फोडत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
तोडा, फोडा आणि राज्य करा हा त्यांचा अजेंडा
घाटकोपरमधे संघाचे जोशी येऊन ‘माझी मातृभाषा गुजराती’ असल्याचे जाहीरपणे म्हणाले, याकडे लक्ष वेधत ठाकरे म्हणाले की, हे विष पसरवण्यामागे भाजप-संघच आहेत आणि त्याचे खापर आपल्यावर फोडत आहेत.“तोडा, फोडा आणि राज्य करा हा त्यांचा अजेंडा आहे; पण यातून आपल्या भूमिपुत्रांनी एकत्र राहून राज्य सांभाळायचं आहे,” असे त्यांनी नमूद केले. शिवसेनाच हे काम करू शकते, असा विश्वास जनतेला वाटतो, “मनगटात हिम्मत असेल, तर विजय दूर नसतो.” असे ते म्हणाले.
पक्ष फोडतात तसेच आता घरेसुद्धा फोडण्याचा प्रयत्न
ठाकरे म्हणाले की, काही जण शिवसेनेतून बाहेर गेले होते, पण आज त्याच परिसरातून डोंबिवलीतून भाजपचे काही नेते पुन्हा शिवसेनेत येत आहेत. “भाजप आणि गद्दार किती ढोंगी आहेत हे लोकांना उमगू लागलं आहे. जोशात येणं ठीक, पण आता डोळे उघडे ठेवून सगळं पाहण्याची वेळ आहे,” असा टोला त्यांनी लगावला. भाजप हा कपटकारस्थान करणारा पक्ष असल्याचे सांगत त्यांनी आरोप केला की, जसे ते पक्ष फोडतात तसेच आता घरेसुद्धा फोडण्याचा प्रयत्न त्यांचे नेते करत आहेत. पालघरमधील साधू हत्याकांडाचा उल्लेख करत त्यांनी भाजपची दुटप्पी भूमिका उघड केली. “ज्यावर आरोप केले त्यालाच भाजपने पदरात घेतले. हे पाप झाकलं जाईल असा त्यांना वाटलं, पण गोष्ट चव्हाट्यावर आल्यावर पक्षप्रवेश स्थगित केला,” अशी टीका ठाकरे यांनी केली.
‘मराठी माझी आई आहे, ती मेली तरी चालेल’
भाषिक प्रांतवादाबाबत ठाकरे म्हणाले की, कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेवर अत्याचार करू नये. “भाषेसाठी कोणी खून करावा, मारामारी करावी ही परिस्थितीच भयावह आहे. हा भाषिक प्रांतवाद सुरू झाला तो कुणाकडून?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मागाठाण्याच्या आमदाराने केलेल्या ‘मराठी माझी आई आहे, ती मेली तरी चालेल’ या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी विचारले, “अशी मानसिकता असेल तर अपेक्षा तरी काय करायची?”
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा