
Mumbai News: दक्षिण मुंबईला (South Mumbai) प्रस्तावित वाढवण बंदराशी (Vadhvan Port) थेट जोडण्यासाठी 300 मीटर लांबीचा उन्नत पूल बांधण्यात येणार आहे. या माध्यमातून एमएमआरडीएच्या (MMRDA) उत्तन–विरार सागरी सेतूला वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाशी थेट जोड मिळणार असून, या जोडणीमुळे मुंबई ते वाढवण (Mumbai to Vadhvan) हा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण करता येणार आहे.
Mumbai News: कसा असेल हा मार्ग?
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) देशातील आतापर्यंतचा सर्वाधिक क्षमतेचा वाढवण बंदर प्रकल्प उभारत आहे. या बंदराला जोडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) वरोर ते तवा जंक्शन असा विशेष महामार्ग उभारणार आहे. हा महामार्ग सरळ वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) दिलेल्या माहितीनुसार, याच द्रुतगती मार्गाला आता उत्तन–विरार सागरी सेतूची जोडणी करण्यात येणार आहे, ज्यामुळे सागरी महामार्गात एक महत्त्वाची कडी तयार होणार आहे.
Mumbai News: 300 मीटर उन्नत मार्ग कसा उभारला जाणार?
– उत्तन–विरार सागरी सेतूचा शेवट चिखल डोंगरी (विरार) परिसरात होतो.
– चिखल डोंगरीच्या पूर्वेला अगदी जवळून वडोदरा–मुंबई द्रुतगती मार्ग (VME) जातो.
– या दोन महत्त्वाच्या बिंदूंमध्ये 300 मीटर लांबीचा उन्नत पूल / फ्लायओव्हर उभारून दोन्ही मार्ग प्रत्यक्ष जोडले जातील.
– हा पूल NHAI उभारणार असून, याबाबत राज्य आणि केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्याचे MMRDA च्या सूत्रांनी सांगितले आहे.
Mumbai News: वाढवण बंदराचा प्रवास होणार वेगवान
एमएमआरडीएच्या सूत्रांच्या माहितीनुसार, “सागरी किनारा मार्ग, तीन सागरी सेतू, जोड रस्ता, द्रुतगती मार्ग आणि विशेष महामार्ग असा सुमारे 120 किमी लांबीचा अखंड मार्ग तयार होणार आहे. हा मार्ग सरळ असल्याने दक्षिण मुंबईतून वाढवण बंदर फक्त एका तासात गाठता येणार आहे. तसेच विरारपुढे वाढवणपर्यंत सागरी किनारा मार्ग बांधण्याच्या हजारो कोटींच्या खर्चातही मोठी बचत होईल.” या जोडणीमुळे बंदर, मालवाहतूक, औद्योगिक वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा