
मुंबई : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? हा प्रश्न यासाठी विचारला जातोय कारण याच मुंबई आणि बॉम्बेचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. याचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी मुंबई आयआयटीच्या कार्यक्रमात केलेले एक वक्तव्य. “आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई केले नाही यासाठी देवाचे आभार मानतो” असं ते म्हणाले. या वक्तव्याने पुन्हा एकदा बॉम्बे विरुद्ध मुंबई असा वाद चांगलाच पेटल्याचं दिसतंय. या सगळ्याचा समाचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुद्धा घेतला आहे.
मुंबई विरुद्ध बॉम्बे… मुंबईला बॉम्बे म्हणून संबोधणाऱ्याचा विरोध या आधी आक्रमकपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. 2009 साली प्रदर्शित झालेल्या “वेक अप सीड” या चित्रपटात मुंबई ऐवजी बॉम्बे शब्द अनेकदा उच्चारला गेला. यावर मनसेने आक्षेप घेत कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर या प्रकरणात करण जोहरला माफी मागावी लागली.
या प्रकरणानंतर अनेकदा बॉम्बे विरुद्ध मुंबई असा वाद पाहायला मिळाला तेव्हा मनसेने प्रखरपणे भूमिका मांडली. आता केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या ताज्या वक्तव्यानंतर हा वाद पुन्हा एकदा वाढलाय.
Jitendra Singh On IIT Mumbai : नेमकं काय म्हणाले जितेंद्र सिंह?
राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत फॅब्रिकेशन अँड सेंट्रल फॅसिलिटी उद्घाटन करण्यासाठी जितेंद्र सिंह मुंबई आयआयटीमध्ये आले होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषण केलं. ‘आपण देवाचे आभार मानतो की आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई केले नाही. म्हणजे ज्या प्रकारे आयआयटी मद्रास हे नाव तसेच राहिले, तसेच आयआयटी बॉम्बे चे सुद्धा राहीले‘ असं जितेंद्र सिंह म्हणाले.
Raj Thackeray On IIT Mumbai : राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत या सगळ्याचा समाचार घेतला. सरकारला मुंबई हे नाव खटकतंय… मुंबई ऐवजी बॉम्बे नाव त्यांना करायचं आहे. मुंबई आणि हळूहळू एमएमआर गुजरातला जोडायचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मराठी माणसांना हे कळायला हवं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
आयआयटी बॉम्बे हे संसदेच्या कायद्याने स्थापित केलेल्या आयआयटींपैकी एक आहे. शिवाय विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत आयआयटी मुंबईचे करार आहेत. त्यामुळे नावात बदल करायचा झाल्यास कायद्यात सुधारणा करावी लागेल अशी माहिती या संदर्भात मिळाली आहे.
IIT Mumbai Vs IIT Bombay : मुंबईतील राजकारण तापलं
केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आणि बॉम्बे विरुद्ध मुंबई हा वाद वाढला. मनसेकडून रात्री मुंबई आयआयटीच्या गेटसमोर आयआयटी बॉम्बे नाही आयआयटी मुंबई असे बॅनर लावण्यात आले. यावर भाजपच्या नेत्यांनी सुद्धा राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
आयआयटी बॉम्बेचं नाव लगेच तातडीने आयआयटी मुंबई करून बदलणे जरी शक्य नसलं तरी मुंबई आणि बॉम्बे संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर ही मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे मुंबई आणि बॉम्बेच्या या वादामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणसुद्धा तापलेलं पाहायला मिळतंय.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा