
हिंदी सिनेसृष्टीत अशी अनेक अजरामर गाणी आहेत, जी दशकानुदशके रसिकांच्या मनात घर करून राहिली आहेत. संगीत ही अशी एकमेव कला आहे, जी काळाच्या पलीकडे जाऊनही लोकांच्या हृदयात जिवंत राहते.
54 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेलं असंच एक गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. हे गाणं म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांची अखेरची आठवण ठरलेलं. चित्रपट 'पाकीजा'मधील अजरामर गीत ‘चलते चलते यूं ही कोई’.
मीना कुमारी यांच्यासारखी महान अभिनेत्री आणि ‘सुरांची कोकिळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज जेव्हा एकत्र येतो, तेव्हा ते गाणं प्रेक्षकांच्या मनाला भिडतं. 'पाकीजा' या चित्रपटात हा संगम पाहायला मिळतो.
पाकीजा हा रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. ज्याला बनवण्यासाठी तब्बल 15 वर्षांचा काळ लागला. चित्रपटाची कास्टिंग आणि लोकेशन्स ठरवण्यातच जवळपास 8 वर्षे गेली. 1971 मध्ये शूटिंग पूर्ण झालं, मात्र या दीर्घ कालावधीत मीना कुमारी यांच्या प्रकृतीत आणि दिसण्यात मोठे बदल झाले होते.
त्यामुळे काही दृश्यांमध्ये त्यांचा चेहरा दुपट्ट्याने झाकून शूटिंग करण्यात आलं. 1.25 कोटी रुपये बजेट असलेला 'पाकीजा' चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 6 कोटी रुपयांची कमाई केली आणि सुपरहिट ठरला.
मात्र चित्रपटाच्या रिलीजच्या काळातच मीना कुमारी यांची तब्येत गंभीर झाली. रिलीजच्या अवघ्या तीन आठवड्यांत त्या कोमामध्ये गेल्या आणि काही दिवसांमध्येच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.