
चंद्रपूरमधील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याच्या घटनेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी या कृतीचे समर्थन न करता संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे. ज्यांनी शेण खाल्लेलं आहे, त्यांना जाब विचारला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवार केला आहे. देशपांडे यांच्या आरोपानुसार, सुपर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना चंद्रपूरमधील या डीलबद्दल आधीच माहिती होती आणि कोणतीही कारवाई होणार नाही. तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी देखील यावर भाष्य करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, राऊत यांनी शेण खाल्लं या विधानावर बोलू नये, कारण २०१९ मध्ये सत्तेसाठी काँग्रेससोबत युती करून उद्धव ठाकरे गटानेच पहिल्यांदा शेण खाण्याचं काम केलं होतं, असा दावा बन यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी हयातभर काँग्रेसला विरोध केला होता, तरीही त्यांच्यासोबत सत्तेत बसणे म्हणजे शेण खाणे असे त्यांनी म्हटले.
याच वादात, चंद्रपुरातील ठाकरे गटाच्या नगरसेवकांना भाजपने प्रत्येकी एक कोटी रुपये दिले असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला. यावर राऊत यांनी, पैसे मोजायला बसले होते का? असा प्रतिप्रश्न करत देशपांडे यांच्या आरोपावर टीका केली. हा वाद येत्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.