Headlines

लग्न ठरलं अन् कांदेपोह्याच्या कार्यक्रमात नवरीने केलं असं काही… नवरदेवाच्या डोळ्यादेखत भयंकर घडलं

लग्न ठरलं अन् कांदेपोह्याच्या कार्यक्रमात नवरीने केलं असं काही… नवरदेवाच्या डोळ्यादेखत भयंकर घडलं
लग्न ठरलं अन् कांदेपोह्याच्या कार्यक्रमात नवरीने केलं असं काही… नवरदेवाच्या डोळ्यादेखत भयंकर घडलं


लग्नाचे स्वप्न दाखवून भोळ्याभाबड्या तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लुटेरी दुल्हन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य आरोपी सिमरन पाटीलसह तिच्या आई, भाऊ आणि दोन साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने नाशिकच्या एका तरुण शेतकऱ्याची २ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बानगाव येथील अविनाश चांगदेव कवडे या तरुण शेतकऱ्याला लग्नासाठी मुलीचा शोध होता. ऑनलाईन माध्यमातून मध्यस्थांमार्फत त्यांचा संपर्क घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सिमरन गौतम पाटील हिच्याशी झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याचे भासवून, लग्नाचा सर्व खर्च मुलाकडच्यांनी करावा, अशी अट या टोळीने सुरुवातीलाच घातली होती.

ठरल्याप्रमाणे १० फेब्रुवारी २०२६ रोजी अविनाश कवडे चोरंबा येथे पोहोचले. तिथे गेल्यावर लग्नाचे बोलणे निश्चित होण्यापूर्वीच आरोपींनी मोठ्या रकमेची मागणी करत दबाव टाकला. या टोळीने फसवणुकीच्या उद्देशाने कवडे यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये उकळले. पैसे हातात पडताच सिमरन, तिची आई आशा पाटील आणि भाऊ करण पाटील यांनी पोहे आणायला जातो असा बहाणा केला. यानंतर त्यांनी स्कुटीवरून धूम ठोकली. त्यांच्यापाठोपाठ इतर दोन साथीदारही तिथून सटकले. काही वेळातच सर्वांचे मोबाईल बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे कवडे यांच्या लक्षात आले.

गुन्हा दाखल

कवडे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार केशव ठाकरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी सिमरन पाटील, तिची आई आशा पाटील, भाऊ करण पाटील (सर्व रा. चोरंबा) आणि त्यांचे सहकारी सुनील राठोड व माणिक पवार (रा. नंदपूर मोहा, ता. पुसद) यांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सुरु

विशेष म्हणजे, मुख्य आरोपी सिमरन पाटील हिचा गुन्हेगारी इतिहास धक्कादायक आहे. काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून त्याची दुचाकी हिसकावून नेली होती. या प्रकरणात ती आणि तिचा भाऊ आरोपी होते. या अपमानामुळे संबंधित शेतकऱ्याने १४ जून २०२५ रोजी आत्महत्या केली होती. त्या गुन्ह्यात सिमरन नुकतीच कारागृहातून जामिनावर बाहेर आली होती. बाहेर येताच तिने पुन्हा फसवणुकीचा नवा डाव मांडला. या टोळीने महाराष्ट्रसह इतर राज्यांतही अशाच प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *