
लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांना फटका बसला आहे. ग्रामीण लातूरमधील अनेक भागांत, विशेषतः रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशमुख गावामध्ये, पिके पूर्णपणे आडवी पडली आहेत. यामुळे ज्वारी काळीभोर पडून तिला बाजारात भाव मिळत नाहीये.
फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आंब्याला आलेला मोहोर गळून पडला असून, लागलेले आंबेही गळून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. निसर्ग आणि सरकार या दोन्हीकडून शेतकरी अडचणीत सापडल्याची भावना व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.