
राज्यसभेच्या एकूण 36 जागा रिक्त झाल्या आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सात जण जाणार आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या सहा उमेदवारांची निवड निश्चित आहे. महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपचे काल त्यांच्या वाट्याच्या चार उमेदवारांची नाव जाहीर केली. यात रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार राज्यसभेवर जाणार आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक जागा आहे. ते कोणाला संधी देणार? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. ते नाव आता समोर आलं आहे. शिवसेनेकडून राज्यसभेवर राहुल शेवाळे जातील अशी चर्चा होती. पण ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर केला.
राहुल शेवाळे यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना संधी दिली. आता विधानभवनात ज्योती वाघमारे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकनाथ शिंदे तिथे उपस्थित आहेत. राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, विश्वासू मानले जातात. दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे शिवसेनेकडून उभे होते. पण उद्धव ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी त्यांचा पराभव केला. राहुल शेवाळे यांचा शाखाप्रमुख, नगरसेवक ते खासदार असा प्रवास राहिला आहे.
ज्योती वाघमारेंची निवड हा एक धक्का
राहुल शेवाळे यांनी महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष अशी पदं भूषवली आहेत. राहुल शेवाळे लोकसभा निवडणुकीला हरले तेव्हा ते विद्यमान खासदार होते. 2022 साली शिवसेनेत फूट पडली. बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर काही महिन्यांनी राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. राहुल शेवाळे हे शिवसेनेतले अनुभवी, दांडगा जनसंपर्क असलेले नेते आहेत. त्यांच्या जागी ज्योती वाघमारेंची निवड हा एक धक्का आहे. ज्योती वाघमारे या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आक्रमकपणे बाजू मांडत असतात.
महाराष्ट्रातून राज्यसभेवरील कुठले खासदार निवृत्त होतायत?
महाराष्ट्रातील डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंडू आठवले या सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या या सात जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.