
जालना येथे समोर आलेल्या अवैध गर्भपात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. दिलीपसिंह राजपूत यांना भाजप नेत्यांचे संरक्षण मिळत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणे महाराष्ट्रासाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत भाजपवर जोरदार निशाणा साधला. “गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. दिलीपसिंह राजपूतने कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकली; मात्र भाजपच्या काही नेत्यांनी त्याला रेड कार्पेट घातले. ही तुमची नवी ‘पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग’ योजना आहे का?, जिथे कायद्याने शोधलेला गुन्हेगार भाजपमध्ये जाताच पवित्र होतो,” अशी टीका त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केली. तसेच, “एकीकडे पोलिसांना आरोपी सापडत नव्हता आणि दुसरीकडे तो काही नेत्यांसोबत फोटो काढत होता. हा सत्तेचा माज आहे की कायद्याची थट्टा?” असा सवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.