
नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर चालतं. लग्नात दोघंही एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतात. एकमेकांच्या विश्वासाला तडा न देण्याचं वचन देतात. आणि एकमेकांच्या सुखदु:खात खंबीरपणे एकमेकांना साथ देण्याचं वचनही देतात. पण लग्नानंतरचं आयुष्य साधसोपं राहतं असंच नाही. कधी कधी दोघांपैकी एकजण भ्रमात जातो. आणि त्यातून वादाला सुरुवात होते. रोजच्या कटीकटीने आयुष्य नको नको होऊन जातं. आणि रोजची कटकट एक दिवस गंभीर गुन्ह्याला जन्म देते. कल्याणमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे.
कल्याणवरून एक आरोपी नाशिकला गेला. संपूर्ण प्रवासात डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. नाशिकला उतरताच तो नाशिक पोलीस ठाण्यात गेला. मी बायकोला मारून आलोय, असं त्याने पोलिसांना थेट सांगितलं. समोरच्या व्यक्तीच्या तोंडचे हे शब्द ऐकून कामात व्यस्त असलेले पोलीसही हादरले. अत्यंत निर्विकार चेहऱ्याने संशयित आरोपीने कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली. त्यानंतर त्याने पोलिसांना सर्व काही सांगितलं. त्याने जे सांगितलं त्यामुळे पोलीसही हादरून गेले.
कल्याणमध्ये घटना
विशाल भुतकर असं या आरोपीचं नाव आहे. तो कल्याणच्या उंबर्डे येथे राहतो. उंबर्डे येथे त्याने पत्नी अर्चना हिचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तो नाशिकला गेला आणि नाशिक पोलीस ठाण्यात जाऊन त्याने सर्व कबुली दिली. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिची गळा दाबून हत्या केल्याचं त्याने सांगितलं. विशाल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दोघांमध्ये त्यावरून वाद व्हायचे. गेल्या अनेक महिन्यांपासून घरात वाद सुरू होते. कटकटी वाढत होत्या. त्यातून त्याने रागाच्या भरात अत्यंत वाईट कृत्य केलं. भुतकर यांना दोन मुलं आहेत. आई हयात नाही आणि वडील तुरुंगात… अशी अवस्था आता या दोन्ही मुलांची झाली आहे.
आधी भावाला सांगितलं…
विशाल आणि अर्चना यांच्यात सारखे वाद होत असल्याने तो दुसरीकडे गेला होता. गुन्ह्याच्या दिवशी विशाल उंबर्डेला आला. तिथे दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्याचवेळी त्याने अर्चनाचा गळा दाबून तिचा खून केला आणि नाशिकला पळून गेला. नाशिकला आल्यावर त्याने सर्वात आधी भावाला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर त्याचा भाऊ त्याला नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात घेऊन आला. माझा भाऊ काय सांगतो ते नीट ऐका, असं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर विशालने बोलायला सुरुवात केली. मी बायकोचा खून करून आलोय, हे पहिलंच वाक्य त्याने उच्चारलं आणि पोलिसांच्याही पायाखालची जमीन हादरली. त्यानंतर विशालने सर्वच सांगून टाकलं.
विशालने जे सांगितलं त्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही. त्यामुळे पोलिसांनी थेट कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना फोन लावून खातरजमा करायला सांगितलं. कल्याण पोलिसांनी खातरजमा करून अर्चनाचा खून झाल्याचं सांगितलं. त्यानंतर नाशिक पोलिसांनाही खात्री पटली आणि विशालला ताब्यात घेण्यात आलं.