
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा एक पवित्र दिवस आहे, जेव्हा केवळ निसर्गातच बदल होत नाही, तर नवीन वर्षाची सुरुवातही होते. महाराष्ट्रात आणि देशाच्या अनेक भागांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घराच्या अंगणात उभारली जाणारी गुढी ही नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे आणि येणाऱ्या सुवर्णकाळाचे प्रतीक मानला जातो. चला तर मग गुढी पाडव्याला गुढी उभारताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात.
गुढी पाडवा कधी साजरा केला जाईल?
द्रिक पंचांगानुसार यावर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च रोजी सकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी सुरू होईल आणि 20 मार्च रोजी पहाटे 4 वाजून 52 मिनिटांनी संपेल. त्यामुळे 2026 चा गुढी पाडवा 19 मार्च रोजी साजरा केला जाईल.
गुढीपाडव्याचा दिवस खास का असतो?
गुढीपाडवा हा दिवस नववर्षाची सुरुवात मानला जातो. असे मानले जाते की, याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. हा दिवस जीवनातील एका नवीन सुरुवातीचे पुढे जाण्याचे, भूतकाळातील दुःख मागे सोडण्याचे आणि यशासाठी प्रयत्न करण्याचे प्रतीक आहे. घराबाहेर उभारलेली गुढी घरात आनंद, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.
घराबाहेर गुढी उभारण्याचे महत्त्व
गुढी पाडव्याच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीजवळ गुढी उभारली जाते. अशातच गुढी उंच उभारणे शुभ मानली जाते, जेणेकरून ती दुरूनही दिसेल आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करेल. ही गुढी बांबूच्या काठीवर साडी, ताब्यांचा भांडे आणि कडुलिंबाच्या पानांनी सजवली जाते. ही सजावट जीवनातील समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानली जाते.
या दिशेत चुकूनही गुढी उभारू नका
धार्मिक श्रद्धा आणि वास्तुशास्त्रानुसार गुढी कधीही दक्षिण दिशेला उभारू नये. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, जी नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. या दिशेला गुढी उभारल्याने घरात सकारात्मकता येण्याऐवजी अडथळे आणि समस्या वाढू शकतात.
कोणती दिशा योग्य आहे?
गुढी पूर्व किंवा उत्तर दिशेला उभारणे नेहमीच सर्वात शुभ मानली जाते. पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा असून ती ऊर्जा, प्रकाश आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. याउलट उत्तर दिशा संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित आहे. या दिशांना गुढी ठेवल्याने घरात आनंद, यश आणि सुदैव येते.
सजावटीचे योग्य नियम आणि पद्धती
गुढी उभारण्यासाठी एका लांब बांबूच्या काठीचा वापर केला जातो. त्यावर सोनेरी काठ असलेले पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशमी कापड बांधले जाते. त्यावर कडुलिंबाची पाने आणि फुलांचा हार बांधला जातो. त्यावर तांब्याचे किंवा चांदीचे भांडे उलटे ठेवले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गुढी उभारताना कधीच जमिनीवर ठेऊन उभारू नये. त्याऐवजी गुढी उभारताना जमिनीवर पाट ठेवा. गुढी उंचावताना मनात आनंदाची भावना असावी. संध्याकाळी, सूर्यास्तापूर्वी आदराने गुढी उतरवली पाहिजे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)