
भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप जिंकला. भारताची टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी आणि एकूण तिसरी वेळ ठरली. त्यानंतर आता काही महिन्यांनी हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. एफआयएच हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन हे बेल्जिअम आणि नेदरलँड्समध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेचा थरार हा 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेसाठी गट जाहीर करण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे भारत आणि पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हॉकी चाहत्यांना या वर्ल्ड कप स्पर्धेनिमित्ताने भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर आमनेसामने येण्याची पहिलीच वेळ असणार आहे.
मेन्स टीम इंडियाचा पहिला सामना कधी?
हॉकी मेन्स टीम इंडियाचा या मोहिमेतील पहिला सामना हा 15 ऑगस्टला होणार आहे. टीम इंडियासमोर वेल्सचं आव्हान असणार आहे. त्यानंतर टीम इंडियासमोर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचं आव्हान असणार आहे. हा सामना 17 ऑगस्टला होणार आहे. तर 19 ऑगस्टला टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहे.
मेन्स टीम इंडिया या मोहिमेतील सर्व सामने एकाच ठिकाणी खेळणार आहे. या सामन्यांचं आयोजन हे नेदरलँड्समधील एम्स्टेलवीनमध्ये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान एकत्र करण्यात आलं आहे. महिला आणि पुरुष वर्ल्ड कप स्पर्धेत 16-16 संघ सहभागी होणार आहेत.
वुमन्स हॉकी टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये?
वुमन्स हॉकी टीम इंडियाचा डी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. या डी ग्रुपमध्ये इंग्लंड, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. वुमन्स टीम इंडिया साखळी फेरीतील सर्व सामने हे नेदरलँड्समध्ये खेळणार आहे.
टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडचं वेळापत्रक
विरुद्ध चीन, 16 ऑगस्ट.
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 18 ऑगस्ट.
विरुद्ध इंग्लंड, 20 ऑगस्ट.
दरम्यान वुमन्स टीम इंडिया या मोहिमेतील पहिल्या सामन्यात चीन विरुद्ध खेळणार आहे. त्यानतंर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. तर महिला ब्रिगेड साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे.