
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यातील साक्री व शिंदखेडा तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा आणि मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातही फळबागा आणि विविध पिकांवर अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा या तालुक्यांनाही या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. ज्वारी, गहू आणि मका ही पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.