
अशोक खरात प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सातत्याने खरात बाबाकडे जात होते, हा या प्रकरणातील मूळ प्रश्न आहे. या मंत्र्यांना संबंधित सर्व गुन्ह्यांची माहिती होती, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, फडणवीस यांच्या मित्र पक्षातील काही आमदार आणि खासदारही खरात यांच्या संपर्कात होते आणि त्यांना बळ देत होते, असा दावा राऊत यांनी केला. राऊत यांनी पुढे सांगितले की, अशोक खरात यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो असल्याचेही समोर आले आहे. तसेच चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतही त्यांचे संबंध असल्याचे त्यांनी म्हटले. राधाकृष्ण विखे पाटील हे खरात यांच्यासोबत विधी करताना पाटावर बसले होते आणि करंगळीने पाणी सोडत असल्याचेही राऊत यांनी सांगितले. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट प्रश्न विचारत, “तुमच्या मंत्रिमंडळातील जे ‘भगतगण’ आहेत, त्यांच्याबाबत तुमची भूमिका काय?” असा सवाल उपस्थित केला.