
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. भोंदूगिरी, आर्थिक फसवणूक आणि महिलांच्या शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात यांच्या संपर्कात अनेक राजकीय व्यक्ती असल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत विविध पुरावे सादर करत गंभीर दावे केले. त्यांनी ‘समता’ नावाच्या पतसंस्थेचा उल्लेख करत काही संशयास्पद बाबी मांडल्या. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत या पतसंस्थेकडून दर महिन्याला मर्यादित मेसेज येत होते. मात्र 27 जानेवारी 2026 रोजी, म्हणजेच अजित पवार यांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी, तब्बल 17 मेसेज आले. त्यानंतर 28 जानेवारी रोजी 19 संदेश, 29 जानेवारीला 10 संदेश, तर 30 आणि 31 जानेवारीला प्रत्येकी 8 मेसेज आले.
हे प्रमाण अत्यंत असामान्य असल्याचा दावा करत, “जे संदेश कधी महिनाभरातही येत नव्हते, ते एका दिवसात येऊ लागले. नेमकं काय घडलं?” असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला. या सर्व पुराव्यांची एसआयटीमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या नव्या दाव्यांमुळे अशोक खरात प्रकरणातील तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.