
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला जातो. मग भोंदू लिंगपिसाट खरातच्या फार्महाऊसवर बुलडोझर का फिरवला जात नाही? खरातचा फार्महाऊस केवळ दाखवण्यासाठी आहे का? असा संतप्त सवाल महिला नेत्यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना या महिला नेत्या अत्यंत आक्रमक झाल्या होत्या. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी हा सवाल केला आहे. त्यामुळे आता खरातच्या फार्महाऊसवर खरोखरच कारवाई होणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. अमरावतीत आरोपीच्या घरावर लगेच बुलडोझर फिरवला. ही कारवाई योग्यच आहे. पण खरातच्या घरावर बुलडोझर का फिरवला जात नाही? आज महिना झाला तरी साधी कारवाई केली जात नाही. हा फार्महाऊस का आम्हाला बघायला ठेवला आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेसही मैदानात
तर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही खरातचं घर तोडण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयान मोहम्मद तनवीर याचं अतिक्रमण असल्याचं घराचं काही बांधकामाचं तोडण्यात आलं. लोखंडी पायऱ्या जेसीबीच्या माध्यमातून तोडण्यात आल्या. तसेच घरासमोरच्या पायऱ्या देखील तोडण्यात आल्या, अशी अशीच कारवाई नाशिक प्रकरणातील अशोक खरात यांच्या घरावर सुद्धा करण्यात यावी, अशोक खरातचे देखील घर जेसीबीने तोडून टाकण्यात यावं, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचीही एसआयटी मार्फत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे. या शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
परतवाडा येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या नराधमांवर आणि त्यांच्या सर्व साथीदारांवर मोक्कासह कठोर कलमान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. यासंदर्भात आज काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आणि काँग्रेसच्या मंडळांने विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोखळे आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेत त्यांना निवेदन दिल.