
लातूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या उष्णतेमुळेच घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय 60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमान 42 अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सोमवारी दुपारी भंडारे आपल्या शेतात काम करत असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. शेतातील इतरांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलवण्यास सांगितले. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.