
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातील ‘जब्या’ ही व्यक्तिरेखा अजरामर करणारा अभिनेता सोमनाथ अवघडे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आपल्या साध्याभोळ्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा सोमनाथ एका न्यूज पोर्टलच्या कृत्यामुळे प्रचंड संतप्त झाला असून त्याने कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेतला आहे.
नेमकं प्रकरण काय?
एका न्यूज पोर्टलने आपल्या बातमीसाठी सोमनाथचा फोटो वापरला आहे. ही बातमी एका ‘त्वचा उजळवणाऱ्या’ (Skin Brightening Cream) क्रीमच्या जाहिरातीशी संबंधित होती. या बातमीचा मथळा आणि त्यासोबत लावलेला आपला फोटो पाहून सोमनाथचा संयम सुटला. आपल्या परवानगीशिवाय आणि अशा चुकीच्या संदर्भात फोटो वापरल्याने त्याने सोशल मीडियाद्वारे आपला निषेध नोंदवला आहे.
सोमनाथची इन्स्टाग्राम पोस्ट
सोमनाथने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, “बोल भिडू या पोर्टलने “मराठवाड्यात पोरांना गोरे करणारी पाकची क्रीम, थेट किडन्या फेल करून गेली” अशा मथळ्याखाली एक बातमी प्रसिद्ध केली आहे. सदर बातमीसाठी त्यांनी माझा फोटो वापरलेला आहे. ही बातमी पाहून माझ्या अनेक मित्र-नातेवाईकांनी गैरसमजातून मला फोन व मेसेज करून माझ्या आरोग्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. आज मी स्वतः ही बातमी पाहिली आणि संपूर्ण प्रकार माझ्या निदर्शनास आला. या पोस्टद्वारे मी नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो की, अशा कोणत्याही क्रीमची जाहिरात मी कधी केलेली नाही आणि भविष्यातही करणार नाही. तसेच, अशा कोणत्याही क्रीमचा मी कधी वापर केलेला नाही आणि अशा प्रकारच्या उत्पादनांचे मी समर्थनही करत नाही” असे म्हटले आहे.
पुढे तो म्हणाला, तसेच, “बोल भिडू यांनी ही बातमी कोणत्या आधारावर प्रसिद्ध केली आणि त्यात माझा फोटो का वापरला, याबाबत मला कोणतीही माहिती नाही. अशा प्रकारे माझा फोटो वापरण्यापूर्वी त्यांच्या कोणत्याही प्रतिनिधीने किंवा पत्रकाराने माझी परवानगी घेतलेली नाही. त्यांची ही कृती अत्यंत मनस्तापदायक असून, त्यामुळे मला तसेच माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात मी माझे वकील अॅड. महेश भोसले@adv_msbhosale_hc यांच्या मार्फत कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे.”
शेवटी सोमनाथने, तूर्तास, कृपया अशा कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि माझ्या आरोग्याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये. मी पूर्णपणे ठणठणीत असून, वर्णवर्चस्वाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही गोष्टींना मी ठामपणे विरोध करतो. मला न विचारतां, केवळ प्रसिद्धीसाठी माझा फोटो वापरून बातमी प्रकाशित केल्याने माझ्याबाबत कोणाचाही, कुठल्याही प्रकारे गैरसमज होऊ नये म्हणून मी हा खुलासा करतो आहे.