
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि राज्यातील सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील सत्तासंघर्ष आणि नेतृत्वाच्या प्रश्नावर भाष्य केले. “मुंबईच्या महापौर रितू तावडे या महापौर म्हणून कमी आणि मुख्यमंत्री होण्याच्या भूमिकेत अधिक दिसत आहेत. मुंबईच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या इतर विषयांवर अधिक बोलताना दिसतात,” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. तसेच राज्य सरकारमधील अंतर्गत मतभेदांवर भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘कोल्ड वॉर’ सुरू असल्याचा दावा केला. “फडणवीस आणि शिंदे यांच्यातील मतभेद आता लपून राहिलेले नाहीत,” असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला. “जर बच्चू कडू म्हणत असतील की फडणवीस यांना बाजूला सारून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, तर याचा अर्थ अमित शाह यांनी अधिक अधिकार शिंदे यांना दिले आहेत,” असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.