
गेल्या काही काळापासून युद्धामुळे जगातील बड्या-बड्या देशांची झोप उडालेली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे अनेक देशांनी सावध पवित्रा घेतला आहे. युद्धाचा वाढता धोका पाहता उत्तर कोरियाने आपले सर्वोच्च नेते किम जोंग ऊन यांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचललं आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर आता उत्तर कोरियाने अधिक सावध भूमिका घेतली असून आपल्या देशाच्या संविधानात बदल केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उत्तर कोरियाने किम जोंग ऊन यांच्या सुरक्षेबाबत मोठे पाऊल उचलले आहे. उत्तर कोरियाने देशाच्या संविधानात महत्त्वाचा बदल केला आहे. आता जर कोणत्याही परकीय शत्रूकडून किम जोंग-उन यांची हत्या झाली, तर उत्तर कोरियन सैन्याने तात्काळ प्रत्युत्तरादाखल अणुहल्ला करणार आहे. हा बदल इराणवर झालेल्या अमेरिकन-इस्रायली हल्ल्यानंतर करण्यात आला आहे. या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव 22 मार्च रोजी प्योंगयांग येथे सुरू झालेल्या 15 व्या सुप्रीम पीपल्स असेंब्लीच्या पहिल्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी उत्तर कोरिया सरकारकडून ही माहिती सार्वजनिक करण्यात आली.
संविधानात कोणते बदल करण्यात आले?
समोर आलेल्या माहितीनुसार किम जोंग-उन यांच्याकडे उत्तर कोरियाच्या अणुसेनेची संपूर्ण कमान आहे. मात्र, नव्या बदलांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचे याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. आता आगामी काळात किम जोंग-उन काम करण्यास असमर्थ असतील किंवा त्यांची हत्या झाली तर शत्रूवर थेट अणुहल्ला करण्यास मान्यता असणार आहे. अणुनीती कायद्यातील सुधारित कलम 3 मध्ये म्हटले आहे की, ‘जर शत्रूराष्ट्रांच्या हल्ल्यांमुळे देशाच्या अणुसेनांच्या कमांड आणि नियंत्रण यंत्रणेला धोका निर्माण झाला तर तात्काळ सुरू केला जाईल.’
अणुयुद्धाचा धोका वाढला
गेल्या काही काळापासून उत्तर कोरिया सतत आपल्या क्षेपणास्त्र प्रणालीचे आधुनिकीकरण करत आहे. यामुळे दक्षिण कोरिया आणि अमेरिकेलाही धोका निर्माण झाला आहे. कारण किम जोंग-उन यांना आक्रमक आणि धडाडीचे निर्णय घेणारे शासक मानले जाते. त्यामुळे आता या नव्या कायद्यामुळे अणुयुद्धाचा धोका आणखी वाढला आहे. या नियमात बदल होण्यामागे हा सध्या सुरू असलेला इराण-अमेरिका संघर्ष हा कारणीभूत घटक आहे.