
मुंबईतील पायधुणी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान डोकाडिया कुटुंबाच्या घरातून उंदीर पळवण्यासाठी वापरण्यात येणारे औषध आढळून आले होते. मात्र, या औषधामध्ये प्राणघातक मानले जाणारे झिंक फॉस्फाईट नसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित औषध हे उंदीर मारण्यासाठी नव्हे तर फक्त पळवण्यासाठी वापरले जात होते. त्यामुळे घरात आढळलेल्या औषधातून झिंक फॉस्फाईट आले नसल्याचे स्पष्ट होत असून, आता हे रसायन नेमके कुठून आले, याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही विषारी पदार्थाचा परिणाम हा त्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. जर अत्यल्प प्रमाणात असे रसायन आढळले असेल, तर त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत नाही. संबंधित औषधाचा वापर प्रामुख्याने वासामुळे उंदीर दूर ठेवण्यासाठी केला जातो. तसेच, अत्यल्प प्रमाणात ते मानवी शरीरात गेल्यास मृत्यू होण्याची शक्यता कमी असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून आणि संबंधित यंत्रणांकडून सखोल तपास सुरू असून, डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.