
2 ऑक्टोबरला काय झालं होतं.. हा प्रश्न ऐकला तरी ‘दृश्यम’ चित्रपट आठवतो. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ या दोन्ही चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर आता ‘दृश्यम 3’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिसऱ्या भागातून पुन्हा एकदा साऊथ सुपरस्टार मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांची जोडी कमबॅक करत आहे. या सस्पेन्स थ्रिलरबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. नुकतंच ‘दृश्यम 3’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून जगभरातील प्री-तिकिट सेलमधून बंपर कमाई झाली आहे. मोहनलाल यांचा हा मूळ चित्रपट मल्याळम भाषेत प्रदर्शित होत असून त्याचा रिमेक अजय देवगण बनवणार आहे. अजयचा हिंदी भाषेतील ‘दृश्यम 3’ मात्र ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
‘दृश्यम 3’बद्दल आधीत प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ आहे. जॉर्ज कुट्टीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा मल्याळम क्राइम थ्रिलर चित्रपट येत्या 21 मे रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी जगभरात दमदार ॲडव्हान्स बुकिंग होत आहे. प्री-तिकिट सेलमध्ये आतापर्यंत या चित्रपटाने जवळपास 5.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला आणखी दहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा आणखी वाढू शकतो.
‘दृश्यम 3’मध्ये मोहनलाल यांच्यासोबत मीना, अंसीबा हसन आणि एस्थर अनिल हे जॉर्ज कुट्टीच्या कुटुंबीयांच्या भूमिकेत परतणार आहेत. तर सहाय्यक भूमिकांमध्ये सिद्दिकी, आशा शरथ आणि मुरली गोपी यांचा समावेश आहे. ‘दृश्यम 3’च्या हिंदी रिमेकचंही काम जलदगतीने सुरू आहे. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून एडिटिंगवर काम सुरू आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
‘दृश्यम’ हा मल्याळम भाषेतील चित्रपट सर्वप्रथम 2013 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट जगभरात हिट झाल्यानंतर अजय देवगणने त्याचा हिंदी रिमेक बनवला. 2025 मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’चा हिंदी रिमेकसुद्धा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यानंतर 2022 मध्ये ‘दृश्यम 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा दुसरा भागसुद्धा हिट झाला. परंतु यावेळी मोहनलाल यांनी एक पाऊल पुढे टाकत अजयचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘दृश्यम 3’ची तारीख निश्चित केली.