
आयपीएल 2026 स्पर्धेनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार रंगणार आहे. टीम इंडियाची आयपीएलनंतर अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी आणि आणि एकदिवसीय मालिका नियोजित आहे. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयने आणखी एका संघासह मालिका निश्चित केल्याचं समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. या कसोटी मालिकेत एकूण 2 सामने होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या मालिकेच्या तारखेबाबत काही निश्चित माहिती नाही. मात्र 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान ही मालिका खेळवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळी अंतर्गत खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
भारताचा श्रीलंका दौरा 2026
क्रिकबझच्या वृत्तानुसार, लंका प्रीमियर लीग 2026 स्पर्धेनंतर उभयसंघात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील अंतिम सामना हा 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच कसोटी मालिकेनंतर उभयसंघात टी 20I सीरिज होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या मालिकेत 3 सामने होणार असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती नाही.
देवजीत सैकीया हे बीसीसीआय सचिव आहेत. सैकीया सध्या श्रीलंकेत आहेत. त्यामुळे बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कसोटी आणि टी 20I मालिकेबाबत अंतिम चर्चा होऊ शकते.
श्रीलंकेत काही महिन्यांपूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे भीषण नुकसान झालं होतं. नुकसानग्रस्तांना मदत व्हावी यासाठी श्रीलंकेविरुद्ध टी 20I मालिका खेळवण्यात येणार असल्याचा शब्द बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला दिला होता. मात्र उभयसंघात 3 सामन्यांची टी 20I मालिका झाल्यास आयोजन हे सप्टेंबर महिन्यात केलं जाऊ शकतं.
टीम इंडियाचं वेळापत्रक
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात वनडे आणि टी 20 मालिका होणं अपेक्षित आहे. या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. मात्र याबाबत अद्याप काहीच निश्चित नाही. बीसीसीआयने बांगलादेश विरूद्धच्या मालिकेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. खरं तर ही मालिका गेल्या वर्षी 2024 साली नियोजित करण्यात आली होती. बांगलादेश-भारत यांच्यातील तणावामुळे ही मालिका स्थगित करण्यात आली होती.
त्यानंतर टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 हात करणार आहे. या दरम्यान एशियन गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच टीम इंडिया सप्टेंबरमध्ये यूएईत अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे.