
Meta Paid Subscriptions : आज सोशल मीडिया हा जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारखी समाजमाध्यमं पाहिल्याशिवाय तर अनेकांचा दिवसही सुरू होत नाही. याच सोशल मीडियाच्या जीवावर अनेकजण श्रीमंतही झालेले आहेत. विशेष म्हणजे या सोशल प्लॅटपॉर्म्सचा वापर करताना तुम्हाला एक रुपयाही कुठे खर्च करावा लागत नाही. परंतु आता हे चित्र लवकरच बदलण्याची शक्यता आहे. कारण व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांची मालकी असलेली मेटा ही कंपनी सर्व सोशल मीडियाचे पेड व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच तुम्हाला सोशल मीडिया वापरायची असेल तर तुम्हाला आता तुमचा खिसा खाली करावा लागणार आहे.
नेमकं काय घडतंय? मेटा कोणता निर्णय घेणार?
मिळालेल्या माहितीनुसार मेटा कंपनी व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियासाठी पेड सबस्क्रीप्शन आणण्याच्या प्रयत्नात आहे. याआधी हे सर्व सोशल मीडिया मंच मोफत होते. परंतु आता हे सर्व प्लॅटफॉर्म पेड होण्याची शक्यता असून पैशांच्या बदल्यात वापरकर्त्यांना काही खास फिचर्स देण्यात येतील. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील बेसिक फीचर्स हे मोफतच असतील. रिपोर्ट्सनुसार मेटा कंपनी मेटा प्लस या नावाने आपला प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च करू शकते. या प्लॅनअंतर्गत इन्स्टाग्राम प्लस, फेसबुक प्लस हे पेड व्हर्जन उपलब्ध असतील. त्यासाठी 3.99 डॉलर प्रति महिना या हिशोबाने पेड सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास मेटाच्या पेड सबस्क्रीप्शनसाठी तुम्हाला 250 ते 350 रुपये द्यावे लागतील. व्हॉट्सअॅपच्या पेड सबस्क्रीप्शनसाठी प
प्रत्येक महिन्याला 2.99 डॉलर द्यावे लागू शकतात.
कोणकोणते फीचर्स मिळणार?
मेटा कंपनीचे हे पेड सबस्क्रीप्शन घेतल्यास तुम्हाला अनेक सुविधा मिळू शकतात. तुमची स्टोरी दुसऱ्यांदा कोणी पाहिली, अनलिमिडेट ऑडियन्स लिस्ट, दीर्घकाळासाठी स्टोरी लाईव्ह ठेवण्याचा पर्याय, नाव उघड न होऊ देता स्टोरी पाहणे, प्रोफाईल जास्त आकर्षक दिसावी यासाठी कस्टम डिझाई असे फीरच तुम्हाला मिळू शकतात. या पेड सबस्क्रीप्शनमध्ये अॅनिमेडेट रिअॅक्शन, विकली स्पॉलाईट असेही फिचर तुम्हाला मिळू शकतील.