
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील जागावाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी उघडपणे समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या जागांवरून महायुतीतील पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणतेही आरोप केले नसल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले. मात्र, मंत्री अतुल सावे यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला. गेल्या 18 महिन्यांत नगरपरिषद आणि नगरपालिकांना कोणताही निधी मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अतुल सावे यांनी आम्हाला कधीही मदत केली नसल्याचेही सत्तार म्हणाले. या आरोपांनंतर अतुल सावे यांनीही प्रतिक्रिया दिली असून महायुतीतील वाद अधिकच चव्हाट्यावर आला आहे. भाजपाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम केलं जात आहे, असा गंभीर आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.