
जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 48 तासांपेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू ठेवण्यासाठी 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले होते.
या प्रकरणानंतर संभाजीनगरच्या सातारा पोलीस ठाण्यात विजय चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान सुरुवातीला न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची 23 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
या कारवाईमुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणात आणखी काही अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.