Headlines

13 जून 1997 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, थिएटर भरलेले असतानाच लागली आग, 59 जणांचा झाला मृत्यू

13 जून 1997 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, थिएटर भरलेले असतानाच लागली आग, 59 जणांचा झाला मृत्यू
13 जून 1997 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, थिएटर भरलेले असतानाच लागली आग, 59 जणांचा झाला मृत्यू


13 जून 1997 हा दिवस हिंदी चित्रपटसृष्टीसाठी जितका महत्त्वाचा ठरला, तितकाच तो देशाच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणूनही ओळखला जातो. याच दिवशी दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा देशभक्तीपर युद्धपट ‘बॉडर’ देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र दिल्लीतील एका चित्रपटगृहात घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळे हा दिवस अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभर न विसरता येणारा दुःखद ठरला.

दिल्लीतील ग्रीन पार्क परिसरात असलेल्या उपहार सिनेमा येथे दुपारी 3 वाजताच्या सुमारास ‘बॉर्डर’चा शो सुरू होता. चित्रपट रंगात आला असतानाच थिएटरच्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाला. ट्रान्सफॉर्मरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे आग लागली आणि काही क्षणांतच धूर संपूर्ण इमारतीत पसरला. धूर आणि आगीमुळे थिएटरमध्ये भीषण गोंधळ उडाला.

अनेक प्रेक्षकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु काही आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग बंद असल्याचे नंतरच्या चौकशीत समोर आले. परिणामी अनेक लोक थिएटरमध्येच अडकून पडले. या दुर्घटनेत तब्बल 59 जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. मृतांमध्ये महिला, मुले आणि संपूर्ण कुटुंबांचाही समावेश होता.

चौकशीत उघड झाल्या गंभीर त्रुटी

या दुर्घटनेनंतर झालेल्या तपासात सुरक्षाविषयक अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. अग्निसुरक्षेचे नियम पाळण्यात आले नव्हते, आपत्कालीन मार्ग व्यवस्थित खुले नव्हते आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रेक्षकांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक व्यवस्था अपुरी होती. त्यामुळे ही दुर्घटना केवळ अपघात नसून निष्काळजीपणाचा परिणाम असल्याची भावना देशभरात व्यक्त करण्यात आली.

उपहार अग्नितांडव प्रकरणानंतर देशभरातील चित्रपटगृहांमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आणि सुरक्षा मानकांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाऊ लागले.

‘बॉर्डर’चा ऐतिहासिक प्रवास

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील लोंगेवाला लढाईवर आधारित ‘बॉर्डर’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी युद्धपटांपैकी एक मानला जातो. सुमारे 12 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 66.70 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि तो त्या काळातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *