
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक मानला जात आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली असून उमेदवारांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक दोन्ही वाढली आहे.
या निवडणुकीत सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड-नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर, बीड तसेच परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-हिंगोली आणि जालना या मतदारसंघांतील निकाल जाहीर होणार आहेत. या सर्व निकालांवर राज्यातील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.
दरम्यान, एकूण 17 जागांपैकी 6 जागांवर मतदानाआधीच महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 11 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज होत आहे.
विदर्भातील मतदारसंघांमध्ये विशेषतः चंद्रपूर आणि इतर काही जागांवर बिनविरोध निवडणुका पार पडल्या आहेत. तर यवतमाळ-वाशीममध्ये देखील निवडणूक बिनविरोध झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीमध्ये काँग्रेसची भूमिका निर्णायक नसल्याने तेथे भाजपचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे.
नागपूरमध्ये झालेल्या मतदानाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे सुमारे 823 मतदानांपैकी 579 मतं महायुतीकडे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात असला तरी काँग्रेस आपली मतं फुटू नयेत यासाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेसची मतं टिकवण्यात यश येते की नाही आणि भाजपला आणखी लाभ होतो का, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.
सध्या सुरू असलेल्या मतमोजणीमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, अंतिम निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.