
शिवसेना UBT गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या मतदार संघात जाऊन आज जाहिर सभा घेतली. ही सभा परभणी येथे आयोजित करण्यात आली होती. सभेत शिवसैनिकांशी बोलताना उद्धव ठाकरे चांगलेच कडाडले आहेत. त्यांनी हिंदूंशी केलेली गद्दारी, कॉकरोच जनता पार्टी जन्म, नवीन भाजप आणि बाबर जनता पार्टीबाबत बेधडक वक्तव्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले वाचा…
उद्धव ठाकरे परभणीत सभेत बोलताना म्हणाले, तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायचं. तुम्हाला लूट करायची होती रामाच्या नावाने. हिंदूंना जय श्रीराम म्हटलं तर असाच भूलून जातो. जगातील तमाम हिंदूंशी केलेली गद्दारी आहे. कॉकरोच जनता पार्टी जन्माला आली आहे. तशी नवीन भाजप जन्माला आलीय. बाबर जनता पार्टी. ही बाबरांची औलाद आहे. त्याने ते मंदिर लुटलं. हे हे मंदिर लुटत आहे. हे बाबर जनता पार्टीचे आहेत का. त्यांना पाठिंबा द्यायला हे गद्दार गेले का.
पुढे ते म्हणाले, हा राग असाच ठेवला पाहिजे. हा चाबूक गुंडाळून ठेवायला दिला नाही. ही गद्दारीची कीड हा इतिहास झाला आहे. त्यांना तुम्ही निवडून देता. माझीही चूक झाली. मी माफी मागतो. एवढे वर्ष सोबत राहिल्यावर विश्वास ठेवायचा नाही का.
मध्यप्रदेशचे उदाहरण देत उद्धव ठाकरे म्हणाले, मध्यप्रदेशात भाजपने शिवराज सिंह चौहानाच्या नावाने निवडणुका जिंकल्या. मामा म्हणायचे. बनवलं ना मामा. उद्या हा मामा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो. भाजपचा अध्यक्ष बनू शकतो. मामा को उपर बुलाओ. मामा को उल्लू बनाओ. डाल दिया कोने में. आता शिवराजचं नावच नाही कुठे. जो जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येतो त्यांना वेळेवर बाजूला करतात. तसंच देवेंद्र फडणवीस यांचे पखं कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कालपरवा ते माझ्यासोबत विमानात बसले होते. पण हतबल होते. कळतच नव्हतं हे मुख्यमंत्री आहे. असा काय झाला हा. आत्मविश्वास गमावलेला माणूस. आपले पंख कापतायेत. कापणारे आपलीच माणसे आहेत. हे त्यांना कळतंय. न्याय कुणाकडे मागायचा. कोणतं दार ठोठवायचं. दार उघडलं तर पंख कापणार. ते दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे जे काही वाचले ते वाचून जेवढे दिवस आहेत ते ढकललेले बरे. या परिस्थितीत फडणवीस आहे.
पुढे ते म्हणाले, कदाचित उद्या फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर. नितीन गडकरी होते की नाही. अध्यक्ष होते. पुन्हा अध्यक्ष झाले असते तर पंतप्रधान झाले असते. म्हणून गडकरींचे पंख असे कापले असे कापले की त्यांच्या निष्ठेत इथेनॉलचे पाणीच घालून टाकले. भेसळ करून टाकली. आता गडकरी काय करू शकतात. उड उड उड… कसे उडणार. पंख त्यांनी छाटले.