
मुंबईतील सहा नामांकित रेस्टॉरंट, हॉटेल, बेकरींवर एफडीएने मोठी कारवाई केली. या कारवाईने हॉटेलचालक आणि बेकरीचालकांची धाबे दणाणली आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने एफडीए धडक मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत मुंबईतील आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका नामांकित रेस्टॉरंटसह 6 रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, बेकऱ्या आणि क्लबच्याच्या अन्न सुरक्षा परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य बिर्ला न्यू एज रेस्टॉरंट्स अँड कॅफे प्रा. लि.तर्फे चालविण्यात येणाऱ्या रेस्टॉरंटवर कारवाई नरिमन पॉइंट येथे ‘फ्लिट अँड वार्सा’ या रेस्टॉरंटची 27 जून रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळून आले. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
बोरीवली येथील एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाच अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने कारवाई करण्यात आली. तसेच योग्य लेबल नसलेला साठा जप्त करण्यात आला. भांडुप येथील हॉटेल श्रीकृष्णा येथे रेफ्रिजरेटरची स्थिती निकृष्ट असल्याचे आणि स्वच्छतेच्या अनेक त्रुटी आढळून आल्या.
सांताक्रूझ (पूर्व) येथील हॉटेल गोपाळकृष्णाच्या स्वयंपाकगृहात उंदीर फिरताना दिसला. अंधेरी येथील कराक एंटरप्रायझेस प्रा. लि. मध्ये झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आला. वांद्रे येथील ‘मद्रास डायरीज’ येथे स्वच्छतेबाबत नियमांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. ज्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली. भेसळयुक्तांच्या विरोधातही अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई केली जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाचा कारभार आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हातात घेतल्यापासून अशाप्रकारच्या धडक कारवाया केल्या जात आहेत. भेसळ करणाऱ्या लोकांविरोधात थेट कारवाई केली जात आहे. अनेकांनी या कारवाईचा मोठा धसका घेतला. काहींनी भेसळयुक्त आंब्याच्या रसाचे पॅकेट, पनीर आणि दूध फेकून दिले. कारवाई होण्यापूर्वीच काही लोकांकडून भेसळयुक्त पदार्थ फेकली जात आहेत. मध्यंतरी तुकाराम मुंडे यांची बदली होणार असल्याचीही चर्चा रंगताना दिसली.