
राज्यात पावसाने कहर केला. गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच मुंबईसह पुण्यातही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. सतत पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच आता पुणे आणि मुंबई महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला. यासोबतच सीएसएमटीकडून पुण्याकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे आणि मुंबई वाहतूक पुर्णत: ठप्प झाली. मिसिंग लिंकवर दरड तर द्रुतगतीवर पाणी साचले आहे. रेल्वे मार्गावर ही दरड कोसळली आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळं हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिलाय.
दरड कोसळल्यामुळे आणि सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. सध्या पुणे–मुंबई आणि मुंबई–पुणे या दोन्ही दिशेतील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई दरम्यानचा प्रवास टाळावा.
ज्यांनी प्रवासाचे नियोजन केले आहे, त्यांनी तो पुढे ढकलावा आणि शासन व संबंधित यंत्रणांकडून जारी करण्यात येणाऱ्या वाहतूक सूचना व अद्ययावत माहितीकडे लक्ष द्यावे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, ही नम्र विनंती केली जात आहे. पुणे -मुंबई एक्स्प्रेस हायवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. पुणे – मुंबई एक्सप्रेस हायवे वरती वाहनांची मोठी गर्दी बघायला मिळतंय. लोणावळ्याहून 35 किलोमीटर दूरपर्यंत वाहण्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
पुणे शहरात पावसाचा जोर दोन दिवस कायम राहणार असल्याचा मोठा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला. त्यामध्येच आता पुणे मुंबई एक्सप्रेस वे पूर्णपणे बंद करण्यात आला. गेल्या तीन तासांपासून लोणावळा घाटात मोठी वाहतूककोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांनी शक्य असल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.