
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणात कल्याण न्यायालयाने रमेश म्हात्रे आणि इतर तीन आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाची सुनावणी कल्याण सत्र न्यायालयातील कोर्ट हॉल क्रमांक 6 मध्ये न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग सरन्यायाधीश के. एस. कातकडे यांच्या दालनात पार पडली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तीन आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, रमेश म्हात्रे यांना न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आल्यानंतर न्यायालयाबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सहआरोपीविरोधात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याची प्रत न्यायालयात सादर करण्याची मागणी फिर्यादीच्या नातेवाईकांनी केली. यावेळी पोलिस आणि फिर्यादीच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
या प्रकरणामुळे रमेश म्हात्रे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईची शक्यताही निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, डॉक्टर मारहाण प्रकरणात पक्षाने तुमच्यावर कारवाई का करू नये, याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांनी रमेश म्हात्रे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व पुढे काय निर्णय घेते आणि रमेश म्हात्रे यांच्यावर पक्षांतर्गत कोणती कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.