बारामतीत चाललंय काय? सांगता सभेनंतर काही तासांत युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर…

बारामतीत चाललंय काय? सांगता सभेनंतर काही तासांत युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर…


Maharashtra Assembly Election: बारामती तालुक्यातील मेडद गावात असलेल्या ‘शरयू मोटर्स’मध्ये पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कंपनीचे मालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे आहेत. श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात बारामती मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांनी काल प्रचार संपण्याआधी अजित पवार आणि युगेंद्र पवार यांनी बारामतीमध्ये शक्तीप्रदर्शन केल्यानंतर काही तासांमध्येच हे सर्च ऑपरेशन करण्यात आलं. 

निवडणूक अधिकारी काय म्हणाले?

विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात हे सर्च ऑपरेशन करण्यात आल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत बारामतीचे विभागाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकार वैभव नावडकर यांनी माहिती दिली आहे. निवडणुकीच्या काळात काही तक्रारी आल्यानंतर त्या ठिकाणी बाजू तपासून पाहिली जाते. तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या नेमण्यात आलेल्या एका विशिष्ट पथकाकडून विविध ठिकाणी तपासण्या करण्यात येतात. त्याच पद्धतीने ‘शरयू मोटर्स’ कंपनीचा तपास करण्यासाठी पथक गेले होते. त्या ठिकाणी कोणतीही रक्कम अथवा काहीही आढळून आले नसल्याचे नावडकर यांनी सांगितलं.

नाव न घेता अजित पवारांनी सांगता सभेत लगावलेला पिता-पुत्रांना टोला

अजित पवारांनी सोमवारी प्रचाराची मुदत संपण्याआधी घेतलेल्या सांगता सभेमध्ये युगेंद्र पवारांबरोबरच श्रीनिवास पवार यांच्यावर सूचक वक्तव्यांमधून निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं होतं. “मला एकाची चिठ्ठी आली. भावनिक करण्याचा प्रयत्न करून विरोधक मत मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं त्यात होतं. असं कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर अजित पवार तुमच्या पाठीशी उभा राहील,” असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी समर्थकांना दिलं. “पवार कुटुंबातील काही जण येतात आणि सांगतात आम्ही पण पवारच आहोत त्यांना दोन आणि आम्हाला दोन मत द्या. मात्र मला असं चालणार नाही. छोटं कुटुंब सुखी कुटुंब नको असलं आपल्याला. साहेबांच्या आणि माझ्या काळात पैसे देऊन कधीही आमच्या सभेसाठी लोक आणावी लागली नाहीत,” असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता युगेंद्र पवारांवर निशाणा साधला. तसेच पुढे, “अशा सवयी तुम्हाला आम्हाला झेपणार नाहीत. माझी काळजी करू नका मी सगळ्यांना पुरून उरेल. कारण तुम्ही माझ्या पाठीशी आहात. सगळेच लोक उद्योगपती नसतात. सगळेच श्रीमंत नसतात,” असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता श्रीनिवास पवार यांच्यावर टीका केली होती.

नक्की वाचा >> कालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?

“काहीजण एकदम अचानक आले आणि…”

“आता कुपन पद्धती जोरात चालू आहे, कुपन कोण देतो हे मला माहित नाही, मात्र जेवायला घाला मात्र टाका टाकी करू नका. तुम्ही कामाच्या मागे उभे रहा. बारामतीत गुंडगिरी आणि दहशत चालणार नाही. यात कोणाचेही लाड केले जाणार नाहीत. आई समोर बसल्यामुळे सारखा घाबरत घाबरत बोलत आहे. मी बारामतीत काम असेल करत असल्यापासून कधीही हिंदू-मुस्लिम दंगल होऊ दिली नाही,” असंही अजित पवार भाषणात म्हणाले. पुढे बोलताना, “काहीजण एकदम अचानक आले आणि इथे येऊन वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत,” असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवारांवर टीका केली. “बारामतीकरांमुळे राज्यातील 10 प्रमुख नेत्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. हे केवळ बारामती करांमुळे शक्य झालं आहे. मी एवढ्या सांगता सभा केल्या मात्र एवढा प्रचंड जनसमुदाय मी कधीही सभेला पाहिला नव्हता. बारामती देशात एक नंबर तालुका करायचा आहे,” असं अजित पावर भाषणात म्हणाले. 





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *