अमर काणे, झी मीडिया, नागपूर : (Attack on Anil Deshmukh News) महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीसाठी काही तास शिल्लक असतानाच एक रक्तरंजित आणि हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळालं. विरोधी आणि अपक्ष नेत्यांवरील हल्ल्यांचं वृत्त समोर आलेलं असतानाच राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर चार अज्ञातांनी दगडफेक केली. हा हल्ला गंभीर स्वरुपाचा होता, ज्यामध्ये देशमुखांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्य़ानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं.
अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. तर, माध्यमांशी संवाद साधताना देशमुख यांचे सुपूत्र सलील देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.
काय म्हणाले सलील देशमुख?
अनिल देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांची भेट घेतल्यानंतर सलील देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मी आताच काटोलवरून अनिल देशमुख यांची प्रकृती पाहून परतलो आहे. माझे वडील गोळी घेऊन बेडवर झोपून आहेत. त्यांच्या कपाळाला आणि मानेला दुखापत झाली आहे, सिटीस्कॅन रिपोर्ट आल्यावर सगळं समोर येईल’, असं सांगत त्यांनी देशमुखांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दिली.
देशमुख सायंकाळी सहा वाजता प्रचार सभा संपल्यावर जलालखेडा येथून येत होते, त्यावेळी त्यांच्यासोबत वाहनामध्ये उज्वल भोयर आणि डॉ.गौरव चतुर्वेदी होते. सुरक्षा रक्षकांची गाडी मागे काही अंतरावर होती त्यादरम्यानच हा भ्याड हल्ला झाला, असं सलील देशमुख म्हणाले. हा हल्ला झाल्यावर काटोल नरखेडच नव्हे तर संपूर्ण नागपूर जिल्हा या घटनेचा विचार करू लागला आहे असा संतप्त सूर त्यांनी आळवला.
‘तुमच्या जिल्ह्यात हल्ले का होत आहेत? अमित शहा यांचे दौरे का रद्द होत आहेत? हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा. हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत असा माझा थेट आरोप आहे’, अशा जळजळीत शब्दांत सलील देशमुख यांनी वडिलांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. एखाद्या नेत्यावर असा हल्ला झाल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना असतात, मात्र आम्ही सगळ्यांना शांततेचा आवाहन केलं आहे, असंही ते म्हणाले.
अनिल देशमुख यांच्या प्रकृतीविषयीची Latest Update
मॅक्स रुग्णालयात अनिल देशमुख यांना आणल्यानंतर त्यांची सिटीस्कॅन ईसीजी व इतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अनिल देशमुख यांचा सिटीस्कॅन व इतर वैद्यकीय चाचण्या सामान्य आल्या आहेत. काही स्थानिक नेते त्यांना कक्षामध्ये जाऊन भेटूनही आले आहेत. देशमुखांची भेट घेऊन आलेल्या स्थानिक नेत्यांनी अनिल देशमुख सुखरूप असल्याची माहिती दिली आहे.