शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आपला घातपात करण्याचा कट असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई दिल्लीतील घरासोबतच सामना कार्यालयाचीही रेकी केल्याच आरोप राऊतांनी केला आहे. त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..
विरोधकांवर तुटून पडणारे, ठाकरेंच्या शिवसेनेची रोखठोक बाजु मांडणारे आणि शेलक्या शब्दात विरोधकांचा समाचार घेणारे नेते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत. बेधडक प्रतिमा असलेले संजय राऊत कुणाच्या तरी रडारवर आहेत. संजय राऊतांच्या भांडुपमधील बंगल्याची दोन मास्कधारी अज्ञातांनी रेकी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. केवळ भांडुपमधील घराचीच नाही तर दिल्लीतील घर आणि सामनाच्या कार्यालयाचीही रेकी केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. घरांची झालेली रेकी म्हणजे घातपाताची तयारी असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
रेकीसंदर्भात संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनीही धक्कादायक दावे केले आहेत. “बाईक तिकडून आली आणि त्यांनी कॅमेऱ्यातून काही शुटिंग केलं. चॅनेलच्या काही जणांनी पाहिलं आणि त्याला हटकलं. त्याच्या पोटावर वरती 5 आणि खाली 5 असे 10 मोबाईल होते. या 10 मोबाईलवर ते शुटिंग करत होते. हटकल्यानंतर ते तेथून निघून गेले,” असं त्यांनी सांगितलं आहे.
संजय राऊत कुणाच्या रडारवर?
– भांडुपमधील घराची दोन अज्ञात दुचाकीस्वारांकडून रेकी
– रेकी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क
– शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजता रेकी केल्याच आरोप
– भांडुपमधील घरासोबत दिल्लीतील घर आणि सामना कार्यालयाच्याही रेकीचा आरोप
– रेकी का? आणि कुणी केली? याचा पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेनंतर आमदार सुनील राऊत यांनी चिंता व्यक्त करत संजय राऊत यांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला आहे. तर या रेकीसंदर्भात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच संजय राऊतांना सुरक्षा देण्याचीही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपींची दखल घेत या रेकीमागे कुणाचा हात आणि आणि नेमका काय उद्देश आहे हे शोधून काढणं अतिशय महत्वाचं आहे.. संजय राऊतांच्या या आरोपांनतर या रेकीचा मास्टरमाईंड नेमका कोण आणि संजय राऊत कुणाच्या रडारवर आहेत हे पोलिसांनी शोधावेत अशी मागणी होत आहे.