What is AIMC: राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामात होणारा विलंब लक्षात घेता, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) स्वयंचलित आणि इंटेलिजेंट मशीन-असिस्टेड कन्स्ट्रक्शन (AIMC) प्रणालीचा वापर वेगाने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रणाली प्रत्येक निर्माणाधीन बांधकाम कोणत्या टप्प्यावर आहे त्याच्या सर्वेक्षणासह सर्व प्रकल्पाच्या स्थितीचा वेळ आणि डेटा देईल. हा डेटा तत्काळ मंत्रालयासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि विभागांना पाठवण्यात येईल.
मंत्रालयाकडून अलीकडेच एक पत्रक जारी करण्यात आलं आहे, जे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) सारख्या सर्व संबंधित विभागांना पाठवलं आहे. या पत्रकात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये AIMC राबवण्यासाठी सूचना आणि माहिती मागवण्यात आली आहे. MoRTH च्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, संपूर्ण भारत योजना तयार करण्यासाठी विभागाने अमेरिका, नॉर्वे आणि युरोपियन युनियन देशांच्या प्रणालींचा अभ्यास केला आहे, जिथे AIMC आधीपासूनच लागू करण्यात आले आहे.
AIMC ची गरज का आहे?
महामार्गाचे बांधकाम करत असताना विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीचा वापर केल्याने या प्रक्रियेला वेग आला आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आल्यानंतर हे काम अधिक सोप्पं झालं आहे. इंटेलिजन्स रोड कन्स्ट्रक्शन मशीनमुळं रस्त्यांची गुणवत्ता सुधारते आणि ते अधिक काळ टिकतात. ही यंत्रे विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करतील.
अलीकडेच, राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की, मार्च 2024 मध्ये निर्माणाधीन 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 952 प्रकल्पांपैकी (राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसह) एकूण 419 प्रकल्पांना विलंब झाला. त्यामुळं प्रकल्पाच्या विविध टप्प्यांपैकी एक टप्पा पूर्ण झाला नाही. याचमुळं राजमार्ग प्रकल्पांना होणाऱ्या विलंबाची अनेक कारणे आहेत. मात्र, मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जुने तंत्रज्ञान, अद्ययावत माहितीचा अभाव आणि कंत्राटदारांची खराब कामगिरी यामुळे समस्या वाढतात.
AIMC मशीन म्हणजे काय?
AIMC मशीन ही एक प्रकारची नवीन तंत्रज्ञानाची मशीन आहे, ज्यात ऑटोमेशन, इंटेलिजन्स, मेकॅनिक्स आणि कंट्रोल यांचा समावेश आहे. मानवी श्रम कमी करून उत्पादन कार्यक्षमता आणि अचूकता वाढवण्यासाठी उत्पादन, बांधकाम, आरोग्यसेवा आणि वाहतूक यासारख्या विविध उद्योगांमध्ये AIMC चा सामान्यतः वापर केला जातो.