'फिक्स पालकमंत्री' रायगडमध्ये भरत गोगावलेंचे भलेमोठे फ्लेक्स, अदिती तटकरे म्हणतात, 'निवडून आलोय त्या जिल्ह्याचे..'

'फिक्स पालकमंत्री' रायगडमध्ये भरत गोगावलेंचे भलेमोठे फ्लेक्स, अदिती तटकरे म्हणतात, 'निवडून आलोय त्या जिल्ह्याचे..'


Bharat Gogawale VS Aditi Tatkare: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी पालकमंत्रिपदावरून दावे प्रतिदावे करण्यात येतायेत. राज्यातील विविध ठिकाणी पालकमंत्रीपदावरुन चुरस पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये ‘भरत गोगावले फिक्स पालकमंत्री’ असे बॅनर लागले आहेत. रायगडच्या लोणेरे इथ हे बॅनर झळकले आहेत. रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून शिवसेना अधिक आग्रही दिसत आहे. आम्हाला मेरिटवर पालकमंत्री पद हवं आहे, अशी मागणी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केली आहे. पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादी कांग्रेसच्या आमदार अदिती तटकरे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

रायगडच्या पालकमंत्री पदावरून पेच कायम असतानाच लोणेरे इथं भरत गोगावले फिक्स पालकमंत्री असे भलेमोठे फ्लेक्स झळकले आहेत. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना अधिक आग्रही झाल्याचे दिसून येतेय. गोगावले समर्थकांनी हे बॅनर लावले आहेत. निवडणुकीपूर्वी याच ठिकाणी भरत गोगावले फिक्स आमदार असे फ्लेक्स लावण्यात आले होते. आम्हाला मेरिट वर पालकमंत्री पद हवं आहे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केलीय. आता रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा वरिष्ठ पातळीवर कसा सोडवला जातो ते पाहावं लागणार आहे.

काय म्हणाल्या अदिती तटकरे?

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे नवी मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आले. वाशी टोल नाका जवळ ढोल ताशांचा गजर, जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी अदिती तटकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भविष्यात अधिकाधिक बालकांसाठी आणि महिलांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न राहील, असे त्या म्हणाल्या. जिथून निवडून आलोय त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. मात्र महायुतीचे मंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

भुजबळ भाजपात जातयत ही अफवा

भुजबळ भाजपात जात आहेत ही अफवा फक्त आपल्यामध्येच आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत. इतक्या वर्षाचा अनुभव पाहता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते फडणवीस साहेब यांना भेटायला गेले आहेत. त्याच्यापेक्षा अधिक यामध्ये समजण्याचे कारण नाही. राज्याच्या वेगवेगळ्या विषयासंदर्भात फडणवीस यांना भेटायला गेलेत. यापेक्षा जास्त निकष लावण्याच कारण नाही, असे अदिती तटकरे म्हणाल्या. 

राज्यात पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच 

राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्याच रस्सीखेच आहे. रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात स्पर्धा आहे. इथे तर आपणच पालकमंत्री होऊ, असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केलाय. पुण्यामध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात स्पर्धा आहे.  ठाणे  जिल्ह्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात तर बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या प्रमुख नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान ठाण्याचं पालकमंत्रिपदं फक्त एकनाथ शिंदे यांनाच मिळावं अशी मागणी कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलीय.  महायुतीच्या मंत्रिमंडळात 12 जिल्हे मंत्रिपदापासून वंचित आहेत..मात्र, आपल्यात कुठलाही वाद होणार नसून पालकमंत्रिपदाचं वाटप होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय. खातेवाटप जाहीर होताच महायुतीत सुरू झालेल्या पालकमंत्रिपदाच्या वादावर महायुतीचे नेते कशाप्रकारे तोडगा काढतात आणि पालकमंत्रिपद नेमकं कुणाला दिलं जाणार हे यादी जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे.





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *