
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आज झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या बैठकीला छगन भुजबळ, अदिती तटकरे, दत्तामामा भरणे आणि हसन मुश्रीफ हे उपस्थित होते.
दरम्यान, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री नरहरी झिरवाळ अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिले. पक्षांतर्गत किंवा अशा कोणत्याही प्रकारची चर्चा आज झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरहरी झिरवाळ यांना संबंधित प्रकरणाबाबत योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित प्रकाराबाबत त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली असल्याचे तटकरे यांनी सांगितले. यासोबतच, संबंधित व्हिडिओ प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे योग्य तो निर्णय घेतील, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.