Headlines

Asha Bhosle : आशा भोसले यांचं निधन कशामुळे? डॉक्टरांनी सांगितलं कारण

Asha Bhosle : आशा भोसले यांचं निधन कशामुळे? डॉक्टरांनी सांगितलं कारण
Asha Bhosle : आशा भोसले यांचं निधन कशामुळे? डॉक्टरांनी सांगितलं कारण


ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशा भोसले यांच्या निधनाचं कारण सांगितलं. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता, असंदेखील डॉक्टर म्हणाले. आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या (सोमवार) दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली. तर सकाळी 11 ते 2 दरम्यान लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येईल.

छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात होत्या दाखल

आशा भोसले यांची नात झनाई भोसलेनं त्यांना छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल केलं असल्याचं स्पष्ट केलं होतं. आशा भोसले यांना प्रचंड थकवा जाणवत असून छातीत संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या लवकर बऱ्या होतील, असं झनाईने सांगितलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित आशा भोसले यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती.

आठ दशकांहून अधिक काळापासून सक्रिय

आशा भोसले या गेल्या आठ दशकांहून अधिक काळापासून भारतीय संगीतसृष्टीत सक्रिय होत्या. 2023 मध्ये त्यांनी दुबईत गाण्यांचा जाहीर कार्यक्रम करून आपला नव्वदावा वाढदिवस मोठ्या उत्साहात सादरा केला होता. लता मंगेशकर यांच्यानंतर आशा भोसले यांचंच नाव घेतलं जातं. त्यांनी विविध भाषा आणि संगीत प्रकारांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. शंकर-जयकिशन, आर. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, इलैयाराजा, बप्पी लाहिरी, ए. आर. रेहमान यांसारख्या मोठमोठ्या संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं आहे.

आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. लता मंगेशकर यांची धाकटी बहीण असलेल्या आशाताईंनी शास्त्रीय, पॉप, कॅब्रे अशा विविध प्रकारची गाणी गात कलाविश्वावर अधिराज्य गाजवलं आहे. 1943 पासून त्यांनी चित्रपटांमध्ये गायनाला सुरुवात केली. आजवर त्यांनी विविध भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप यशस्वी ठरली. आशा भोसले यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘दम मारो दम’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘ये मेरा दिल’ अशी त्यांची अनेक गाणी गाजली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *