
मुंबई : राज्यातील प्रशासकीय आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये सध्या एक जोरदार चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे वांद्र्यातल्या पुर्नविकास प्रकल्पामधल्या गैरगुंतवणुकीची. या प्रकल्पात अनेक बड्या अधिकाऱ्यांनी 50 लाख ते 20 कोटी रुपयांपर्यंत रोख रक्कम गुंतवल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त महेश पाटील (Mahesh Patil) यांच्यावर भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक निशित पटेल (Nishit Patil) यांनी आरोप केले आहेत. निशित पटेल यांनी या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. त्याचा तपास मुंबई पोलीस दलातील ‘प्रॉपर्टी सेल’च्या विभागाकडून करण्यात येत आहे.
Bandra Redevelopment Project : आमिषाला बडे अधिकारी फसले
वांद्र्यातल्या पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास प्रचंड मोठा आर्थिक लाभ होणार असल्याचं आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शंभर टक्के आगाऊ रक्कम प्रकल्पात गुंतवल्यास त्यातून चांगला नफा होणार असल्याचं आमिषही दाखवण्यात आलं. या फसवणुकीला राज्याच्या पोलीस दलातील अनेक बडे अधिकारी, मंत्रालय आणि मुंबई महापालिका अधिकारी, निवृत्त न्यायाधीश तसंच सिनेकलाकारही बळी पडल्याचं समजते.
Mahesh Patil BMC : बीएमसीच्या महेश पाटलांवर आरोप
या प्रकल्पात बड्या मंडळींनी 50 लाख ते 20 कोटींची रोख रक्कम गुंतवल्याचा दावा तक्रारदारानं केला आहे. त्यावरून या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी असू शकते, हे लक्षात येईल. धक्कादायक बाब म्हणजे निशित पटेल यांनी मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर वांद्र्यात कमलकुंज नावाचा गृहप्रकल्प सुरु केल्याचा गंभीर आरोप केला आहे. महेश पाटील आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी तक्रार करून गंभीर आरोप केले आहेत.
Redevelopment Project Scam: मारहाण केल्याचा आरोप
दरम्यान, निशित पटेल यांनी पोलिसात महेश पाटील यांची तक्रार केल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. महेश पाटील यांनी काही बाऊन्सर्सच्या मदतीनं आपल्याला कार्यालयात बांधून मारहाण केल्याचा आरोप निशित पटेल यांनी केला आहे. तसेच बंदुकीचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिल्याचा आणि 60 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोपही त्यांनी केला.
तक्रारदार निशीत पटेल यांनी आणखी एक दावा केला आहे. महेश पाटील यांना आपण तीन इनोव्हा घेऊन दिल्या आहेत असा धक्कादायक दावा निशीत पटेल यांनी केला. आपल्या मित्रांच्या नावावर खरेदी केलेल्या इनोव्हा महेश पाटील यांच्याकडे असल्याचा दावा निशीत पटेल यांनी केला आहे.
Mahesh Patil News : महेश पाटील यांनी आरोप फेटाळले
निशित पटेल यांनी केलेल्या या आरोपांवर महेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे, चुकीचे आणि पुरावेहीन असल्याचे सांगितले. तसेच हे गुंतवणूकदारांचे पैसे निशितनेच जमा केल्याचा आरोप महेश पाटील यांनी केला आहे.
या फसवणुकीशी त्यांचा आणि तक्रारीतील इतर व्यक्तींचा कुठलाही संबध नसल्याचे सांगत महेश पाटील यांनी निशित पटेल यांचे आरोप फेटाळून लावले. निशित पटेल यांना तीन दिवसात पुरावे देण्याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली असून त्यावर कुठलेही उत्तर आले नसल्याचे महेश पाटील यांनी सांगितले.
तपास यंत्रणाना पूर्णतः सहकार्य करून कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली.
आणखी वाचा