
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता मुंबईसह (Mumbai) सर्वच महापालिका निवडणुकांचे वेध राजकीय नेत्यांना लागले आहेत. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून आयोगाने 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर केली. मात्र, या मतदार यादीत मोठा घोळ असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. दुबार मतदार (Voter) हाही या याद्यांमधील महत्त्वाचा मुद्दा असून आता विरोधी पक्षांच्या आरोपानंतर दुबार मतदारांची आकडेवारी मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर विरोधी पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना उत्तर देत प्रारुप मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदारांची वार्डप्रमाणे आकडेवारी समोर आली असून 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचे समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिकेने प्रसारित केलेल्या यादीत 11,01,505 एवढी दुबार नावे आहेत. एस. वार्डमध्ये सर्वाधिक दुबार मतदार असून येथे 69500 दुबार मतदारांची संख्या नोंद झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर,बी वार्डमध्ये सर्वात कमी दुबार मतदारांची आकडेवारी असून बी वार्ड मध्ये 8,398 दुबार मतदार आहेत.
ठाकरे बंधूंकडून मतदार याद्यांवर आक्षेप, आयोगाला पत्र
महापालिका निवडणुकांसाठी आधी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025 ठरली होती आणि ती पुढे ढकलत 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली. मुळात तुम्ही गेले 13 महिने मतदार याद्याच प्रसिद्ध केल्या नाहीत, त्यात जी यादी जी आगामी महापालिका निवडणुकांसाठी सगळ्यात महत्वाची आहे ती प्रसिद्ध करून त्यावर हरकती घ्यायला 8 दिवस दिलेत.. हे काय आहे? मुळात तुम्ही प्रसिद्ध केलेल्या याद्या सदोष. त्यात धड कोणती माहिती नाही. बरं राजकीय कार्यकत्यांना त्यावर काम करायचं असेल तर तुम्ही ज्या याद्या प्रसिद्ध केल्यात त्या फक्त वाचण्यास योग्य. मग त्यावर काम करायचं तर त्याच्यावर काही तांत्रिक संस्कार करा त्यालाच काही दिवस लागतात. मुळात या याद्या एडिटेबल फॉरमॅट मध्ये का नाहीत? जग ‘कृत्रिम बुद्धिमत्तेकडे’ निघालेलं असताना, निवडणूक आयोगाच्या कारभारात तांत्रिक विषयांतील ‘जनरल बुद्धिमत्ता’ पण दिसत नाही, असे म्हणत ठाकरे बंधूंनी निवडणूक प्रक्रिया आणि मतदारा याद्यांवरुन आपला संताप व्यक्त केला आहे.
निवडणूक आयोगाने शेवटची मतदार यादी ही 30 ऑक्टोबर 2024 रोजी प्रकाशित केली. त्यानंतर नवीन यादी प्रकाशित झाली नाही. निवडणूक आयोगाच्याच नियमाप्रमाणे दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन यादी प्रसिद्ध होते आणि त्यानंतर दर तीन महिन्याला सुधारित यादी प्रसिद्ध होते. या वर्षात असं काही झालंच नाही. का? हे हेतुपुरस्सर होतं असं म्हणलं तर निवडणूक आयोगाला लगेच राग येतो. पणजर ते हेतुपुरस्सर नसेल तर मग कारण काय? असा सवाल राज ठाकरे यांनी आयोगाला विचारला आहे.
बरं तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर नवीन मतदार नोंदणी, वगळली गेलेली नावं आणि बदल यासह जे प्रसिद्ध केलं आहेत ती फक्त औपचारिकता म्हणून केलं आहेत असं म्हणायला पूर्ण वाव आहे कारण इतका त्याच्यात गोंधळ आहे. कारण नवीन सुधारित यादीत ते कोण आहेत स्त्री का पुरुष ? त्यांचा पत्ता काय ? याचा कोणताही तपशील नाही. बरं जेंव्हा सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ चोकलिंगम यांना भेटलं होतं तेंव्हा त्यांनी कुठल्याही त्रुटींशिवाय आम्ही याद्या प्रसिद्ध करू आणि तुम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करू असे सांगितलं मग त्याचं काय झालं? असेही ठाकरे बंधूंनी पत्रातून म्हटले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा